सटाणा – बागलाण ही आपली कर्मभुमी असल्याने बागलाणच्या विकासासाठी जलसंवर्धन प्रकल्प आपण तयार केला आहे. याद्वारे सुमारे २५ कोटी रूपयांच्या माध्यमातून तब्बल ६०० भूमिगत बंधारे बांधले जाणार आहेत. या मातीशी बांधिलकी आपण जोपासणार आहोत, असे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी केले.
येथील राधाई मंगल कार्यालयात आज (२३ सप्टेंबर) दुपारी डॉ. दिघावकर यांचा नागरी सत्कार तसेच शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते. डॉ. दिघावकर म्हणाले की, बळीराजाच्या कष्टाची मला जाण आहे. अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करित असतांना बळीराजाला आता लबाड व्यापार्यांच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. मात्र, आता शेतकर्यांचा कैवारी म्हणून पोलिस निश्चितपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे. कायद्याच्या माध्यमातून लबाड व फसवणूक करणार्या व्यापार्यांची आता मात्र गय केली जाणार नाही, असा थेट इशारा देखील त्यांनी दिला.
यावेळी कळवण, देवळा, बागलाण तालुक्यातील फसवणूक झालेल्या शेतकर्यांनी डॉ. दिघावकर यांच्याशी संवाद साधत आपल्यावरील अन्यायाचे कथन केले. दिघावकर यांनी प्रत्येकाच्या शंकेचे निरसन करीत न्याय मिळवून देण्यासाठी पोलिस कटीबद्ध असल्याची ग्वाही दिली.
व्यासपीठावर माजी आमदार संजय चव्हाण, शेतकरी संघटनेचे माजी प्रांतिक अध्यक्ष रामचंद्र पाटील, मविप्र उपसभापती राघो अहिरे, द्वारकाधीश कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत, भाजपा उपजिल्हाध्यक्ष डॉ. विलास बच्छाव उपस्थित होते.
प्रास्ताविक ज.ल.पाटील यांनी केले तर आभार खेमराज कोर यांनी मानले.
कार्यक्रमास शिवसेना उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, माजी नगराध्यक्ष विजय वाघ, माजी जि.प.सभापती यशवंत पाटील, कृउबाचे माजी सभापती नानाजी दळवी, भिका सोनवणे, यशवंत अहिरे, भाऊसाहेब राजे, प्रकाश निकम, सुभाष अहिरे, नामपूर कृउबा सभापती संजय भामरे, जिभाऊ खंडू सोनवणे, नगरसेवक मनोहर देवरे, अभिमन सोनवणे, कृउबा संचालक केशव मांडवडे, कृष्णा भामरे, रविंद्र भामरे, गुलाबराव कापडणीस , जनार्दन सोनवणे, रत्नाकर सोनवणे, झिप्र्रू सोनवणे, केदा काकुळते, केदा भामरे, पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहाय्य पो.नि.देवेंद्र शिंदे, पोलिस उपनिरीक्षक किरण पाटील, राहुल गवई यांचेसह द्राक्ष, डाळींब उत्पादक शेतकरी उपस्थित होते.