नाशिक – शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून ग्राहकांना रेशन दुकानातून नियमितपणे स्वस्त धान्य पुरवठा करण्यात येतो. तसेच मोफत स्वस्त धान्य देखील देण्यात येते. मात्र सध्या काही रेशन दुकानांमधून ग्राहकांना वेळेवर धान्य पुरवठा करण्यात येत नसल्याच्या तक्रारी येत आहेत, त्याच प्रमाणे गेल्या तीन-चार महिन्यांपासून रेशन दुकानातून त्यांना डाळीचा पुरवठा होत नसल्याने ग्राहकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
आगामी दसरा दिवाळीच्या सणाला तरी ग्राहकांना तूरदाळ, चणाडाळीचा पुरवठा करावा अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. सिडको, सातपूर, अंबड आदि परिसरात सकाळी रेशन दुकानावर मोठ्या प्रमाणावर रांगा लागलेल्या दिसतात. कोरोनाच्या संसर्गामुळे गोरगरीबांना हाताला काम आणि पोटाला अन्न नसल्याने रेशन दुकान समोर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे .सातपूर, कामटवाडे ,अंबड ,मोरवाडी जुने सिडको, नविन सिडको, उत्तम नगर आदि भागातील दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी रेशन दुकान खुले होण्याअगोदरच ग्राहक पिशव्या ठेवून नंबर लावत असतात . त्यामुळे रेशन घेणाऱ्या ग्राहकांसाठी सकाळी नऊ वाजता दुकान उघडण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी ,अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. काही ठिकाणी 10 वाजेनंतर देखील रेशन दुकानदार येत नसल्याने ग्राहकांना कधी पावसात तर कधी उन्हात उभे राहावे लागते. तसेच एकाच वेळी अनेक ग्राहकांची गर्दी होत असल्याने फिजिकल डिस्टसिंगचा फज्जा उडत आहेत. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी लक्ष घालून रेशन दुकानाची वेळ सकाळी 9 वाजेपासून करावी तसेच ग्राहकांना नियमितपणे अन्नधान्याचा पुरवठा करावा तसेच तूरदाळ, चणादाळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.