पिंपळगाव बसवंत – महावितरण विभागाला वीज बिल माफ करा, यासंदर्भात निवेदन देऊनही कोणतीच दखल घेतली नसल्याने पिंपळगाव बसवंतसह परिसरात ठिकठिकाणी वीज बिलाची होळी करण्यात आली. वीज बिल माफ करा, अन्यथा खुर्च्या खाली करा अशा घोषणा देत आदिवासी शक्ती सेनच्या वतीने शुक्रवारी आंदोलन करून महावितरण विभागाचा निषेध नोंदविण्यात आला.
लॉकडाऊन काळात चार महिने काम धंदे बंद होते. मजुरीची देखील वणवण निर्माण झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने व उसनवारीवर घेतलेल्या पैशात दोन वेळचे जेवण कोरोना काळात मिळत असताना महावितरण विभागाने वाढीव लाईट बिलाचा शॉक दिलाआहे. दर महिन्याला येणारे बिल देखील वाढीव येत आहे. त्यामुळे मजूर व मागासलेल्या बांधवांच्या डोक्यावर कर्जाचा मोठा डोंगर झाला आहे. हा डोंगर न पेलवणारा असल्याने वीज बिल तत्काळ माफ करावे, अन्यथा येणारे कोणतेच वीज बिल भरणार नसल्याचे सांगत आदिवासी शक्ती सेनेच्या माध्यमातून पिंपळगाव, मुखेड, नारायण टेंभी व कारसूळ आदी ठिकाणी वीज बिलांची होळी करण्यात आली.
यावेळी आदिवासी शक्ती सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रभाकर फसाळे, माजी सरपंच व रामकृष्ण कंक, तालुकाध्यक्ष दत्तू झनकर, तानाजी पवार, दत्तू वागळे, खंडू सापटे, लक्ष्मण पावजी, सचिन रौंदळ, सुनील वागळे, सुनील पवार, नामदेव चौधरी, अंबादास चौधरी, विशाल पवार, लखन कंक, सविता सताळे, शोभा सताळे, शरद गायकवाड, भाऊसाहेब नेहरे, सूरज सूर्यवंशी, सागर शिंगाडे, युवराज चोथवे, हरी रोकडे, मनोज पवार, लक्ष्मण पवार, ऋषिकेश मोगल आदींसह समाज बांधव, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
–
दरमहिन्याला करु होळी – प्रभाकर फसाळे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख, आदिवासी शक्ती सेना
महावितरण विभागाला वेळोवेळी वाढीव वीज बिलांसंदर्भात निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीच दखल घेतलेली नाही. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला ठिकाणी वीज बिलाची होळी करावी लागली. यापुढे प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन वीजबिल माफ करावे, अन्यथा दरमहिन्याला येणाऱ्या वीज बिलांची अशीच होळी केली जाईल.
आमच्या कडे कोणताही निर्णय नाही – एकनाथ कापसे, मुख्य अभियंता, महावितरण विभाग
वीज बिल माफ करणे हा राज्य शासनाचा निर्णय असून अद्यापही आमच्याकडे कोणताही निर्णय आला नसल्याने वीज ग्राहकांना इतर काही समस्या असेल तर त्या सोडवण्याचे काम आम्ही करू.