नाशिक – पाथर्डी फाटा परिसरातील म्हाडा वसाहतीत राहणाऱ्या गर्भवती विवाहितेची हत्या करण्यात आली आहे. दिवसा हा प्रकार घडल्याने परिसरात प्रचंड भितीचे वातावरण आहे.
स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नी मोबाईल फोन घेत नसल्याने खासगी कंपनीत नोकरीला असलेले भरत जाधव (रा. १००२, सी विंग, म्हाडा वसाहत) हे शनिवारी (२४ ऑक्टोबर) दुपारी ४ वाजेच्या सुमारास घरी आले. घराला बाहेरुन कडी लावण्यात आल्याचे पाहून त्यांना संशय आला. त्यांनी घरात प्रवेश करताच त्यांना अतिशय गंभीर बाब दिसली. त्यांची पत्नी प्रणाली भरत जाधव (वय २६) यांच्या तोंडाला रुमाल तर पाय ओढणीने बांधण्यात आले होते. संपूर्ण शरीराला वायरने बांधून ब्लॅंकेटने मृतदेह झाकून ठेवण्यात आला होता. कानातील आणि गळ्यातील दागिने तसेच मोबाईलही नव्हता. ही बाब पाहताच भरत यांनी आरडाओरडा सुरू केला. परिसरातील नागरिकही त्यांच्या घरी जमा झाले. त्यानंतर हा प्रकार त्वरीत पोलिसांना कळविण्यात आला. उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त अशोक नखाते, वरिष्ठ निरीक्षक निलेश माईनकर आणि अन्य पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी चौकशी सुरू आहे. अद्याप कोणत्याही गुन्ह्याची नोंद झालेले नाही. फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे. श्वान पथकाचीही मदत घेतली जात आहे. जाधव दाम्पत्य वर्षभरापासून या घरात राहत आहेत. पोलिस अधिक तपास करीत आहेत.