नाशिक – कोरोनाने बाधित होऊन मृत्यू पावलेल्य पत्रकारांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने जाहीर केलेली पन्नास लाखांची मदत तात्काळ अदा करावी यासह कोरोनाग्रस्त पत्रकारांसाठी राखीव बेड, ऑक्सिजन व व्हेंटीलेटर उपलब्ध करुन द्यावेत, पत्रकारांची मोफत कोरोना तपासणी करावी, अशी मागणी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक जिल्हाध्यक्ष व मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यशवंत पवार यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांचेकडे केली आहे. त्याबाबतचे निवेदनही त्यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, बळी गेलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रूपयांची मदत मिळावी, पत्रकार विमा योजना तातडीने लागू करावी, पत्रकारांसाठी प्रत्येक रूग्णालयात ऑक्सीजन, व्हेंटीलेटरसह त्वरीत बेड उपलब्ध करावा आणि पांडुरंग रायकर आणि संतोष पवार यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चौकशी समितीचे अहवाल जाहीर करून जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत असे नमूद केले आहे. निवेदन देतांना नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे प्रभारी जिल्हाध्यक्ष कल्याणराव आवटे, खजिनदार विजय बोराडे, शरदराव जाधव , किशोर वडणेरे, अण्णासाहेब बोरगुडे, शरद मालुंजकर, सोमनाथ चौधरी हे उपस्थित होते.