वीजेचा जास्त वापर घरमालक व भाडेकरुचे भांडण, परस्पर विरोधी गुन्हे दाखल
नाशिक : वीजेचा जास्त वापर करतात या कारणावरून शिवीगाळ करीत घरमालकाने भाडेकरू असलेल्या तरूणीचा विनयभंग केल्याची घटना रोहीणीनगर भागात घडली. या घटनेत तरूणीच्या कुटूंबियांनी मालकास बेदम मारहाण केली असून त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात विनयभंग आणि परस्परोधी मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार २० वर्षीय तरूणीने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मयुर हिरावत असे संशयीताचे नाव असून तो तरूणी राहत असलेल्या सदनिकेच्या मालकाचा पूतण्या आहे. दोन्ही कुटूंबिय शेजारी – शेजारी राहत असून शनिवारी (दि.२१) संशयीताने युवतीच्या घरात प्रवेश करून तिच्या आईला तुम्ही वीजेचा जास्त वापर करतात या कारणातून वाद घालत शिवीगाळ केली. यावेळी तरूणी वाद मिटविण्यासाठी गेली असता संशयीताने तिचा विनयभंग केला. तसेच संशयीताने तुमच्या कडे बघून घेतो अशी दमदाटी केल्याचे म्हटले आहे. तर संशयीताने दिलेल्या तक्रारीनुसार मुलीसह तिचा भाऊ आणि आईने त्यास बेदम मारहाण केल्याचे म्हटले आहे. या घटनेत सदर इसम जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हारूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात परस्परोधी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक शेळके करीत आहेत.
…….
भाडेकरू महिलेस घराबाहेर काढले
नाशिक : घर मालक असलेल्या महिलेने भाडेकरू महिलेचे सामान घराबाहेर फेकून देत घराबाहेर काढल्याची घटना नवनाथनगर भागात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनी नोनू वाघमारे (रा.नवनाथनगर,पेठरोड) असे संशयीत घरमालक महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सुनिता सुकदेव सहाणे (३६) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सहाणे या वाघमारे यांच्या घरात भाडे तत्वावर राहतात. शनिवारी (दि.२१) त्या घरात नसतांना संशयीत घरमालक महिलेने बंद घराचे कुलूप तोडून अनधिकृतपणे घरात प्रवेश केला. यावेळी संतप्त महिलेने सहाणे यांच्या सामानाची मोडतोड करून सामान घराबाहेर फेकून दिले. यावेळी वाघमारे या महिलेने घरास दुसरे कुलूप लावून खोलीत जाण्यात प्रतिबंध केला. अधिक तपास पोलीस नाईक चौधरी करीत आहेत.
……