नाशिक – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील वर्दळीच्या १४ ठिकाणी कलम १४४ अर्थात जमाव बंदी लागू होण्याची चिन्हे आहेत. शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. त्याच अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने हे पाऊल उचलले आहे.
महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांच्यातर्फे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांना यासंबंधीचे पत्र देण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग थांबण्यासाठी शहरातील १४ ठिकाणी फौजदारी दंड संहितेच्या अंतर्गत कलम १४४ लागू करण्यात यावे, असे या पत्रात म्हटले आहे. हे कलम लागू झाल्यास या १४ ठिकाणी चार पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई असणार आहे.
संबंधित परिसरात केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे मास्क न वापरणे, तसेच सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन न केल्याचे आढळून आल्याचे कैलास जाधव यांनी सांगितले आहे. महानगरपालिकेने सूचित केलेल्या जमाव बंदीच्या निर्णयावर विचारविनिमय सुरु असून लवकरच कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौघुले यांनी दिली आहे.
ही आहेत ती १४ ठिकाणे
भद्रकाली, रविवार कारंजा, त्रिमूर्ती चौक, द्वारका, सिटी सेंटर मॉल येथील भाग, नवीन बस स्थानक (ठक्कर बाजार), निमाणी बस स्टॅन्ड, मेहेर सर्कल, शालिमार, बिटको चौक, रेल्वे स्टेशन परिसर, दत्त मंदिर चौक (नाशिकरोड), लेखानगर आणि पाथर्डी फाटा ही १४ ठिकाणे महापालिका आयुक्तांनी पत्रात नमूद केली आहेत.