नाशिक – राष्ट्रवादी विद्यार्थी कोंग्रेस, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने “कोव्हिड विद्यार्थी पालक अभियान” सुरू करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांचे पालक कोरोंना विषाणूला बळी पडले आणि दुर्दैवाने त्यांना या जगाचा निरोप घ्यावा लागला अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या एकूण खर्चाच्या काही खर्चाची जबाबदारी समाजातील दानशूर व्यक्तींनी घ्यावी असे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी कोंग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे.
शहर उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी सांगितले की, ज्या विद्यार्थ्यांचे पालक कोरोना आजारामुळे दगावले आहेत अशा विद्यार्थी मित्रांवर आज दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना मदतीचा हात आपण द्यायला हवा ही सामाजिक जबाबदारी समजून घेत राष्ट्रवादी विद्यार्थी कोंग्रेस प्रदेश अध्यक्ष सुनिल गव्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली व नाशिक शहराध्यक्ष गौरव गोवर्धने, उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या नेतृत्वात हे अभियान नाशिक शहरात राबविण्यात येत असून समाजातील दानशूर व्यक्ती सक्रिय सहभाग घेत आहेत. अशा गंभीर प्रसंगी जमेल तशी मदत या विद्यार्थ्यांना करण्याची गरज असून फार्मसी, इंजिनियरिंग, लॉं, वैद्यकीय अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी एक पाऊल पुढे येऊन नाशिक शहरातील दानशूर व्यक्तींनी जास्तीत जास्त पुढाकार घ्यावा, असे आवाहन रा. वि. काँग्रेस चे शहर उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी केले आहे.