कानपूर – संपूर्ण देश दसर्याच्या दिवशी रावण दहन करून आनंद साजरा करतो, तर काही लोक असे आहेत की जे शंभर वर्षांच्या जुन्या मंदिरात रावणाची पूजा करतात. ही पूजा फक्त दसर्याच्या दिवशीच होते. कानपूर येथील शिवाला येथे दहा तोंडी ‘दशानन मंदिर’ आहे. विजयादशमीच्या दिवशी सकाळी मूर्तीची पूजा करून मंदिराचे दार उघडले जाते व विधिवत पद्धतीने संध्याकाळी आरती केली जाते.
वर्षातून एकदा म्हणजे केवळ दसर्याच्या दिवशी मंदिराचे दरवाजे उघडले जाते. १९६८मध्ये महाराज गुरु प्रसाद शुक्ला यांनी हे मंदिर बांधले. ते भगवान शिवांचे भक्त होते. कैलास मंदिर संकुलात शक्तीचे पालक म्हणून त्यांनीच हे रावणाचे मंदिर बांधले होते. असे मानले जाते की, दसर्याच्या दिवशी लंकाधीराज रावणाच्या आरती दरम्यान भाविकांना दर्शन होते. महिला मूर्तीजवळ मोहरीच्या तेलाचे दिवे व तरोईचे फुलं अर्पण करतात. कुटुंबासाठी सुख, समृद्धी, ज्ञान आणि सामर्थ्य मिळविण्याची हे लाभदायक असल्याचे येथील भक्तांची श्रद्धा आहे. अहंकार न बाळगण्याचा संदेश यावेळी सर्वजण देतात. दर्शन करतेवेळी अहंकार बाळगू नये अशी शिकवण मिळत असल्याची भावना येथील भक्तांनी व्यक्त केली आहे. आज मंदिर उघडल्यावर विधिवत पूजा करून मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी संध्याकाळी होणाऱ्या आरतीला मोजके जण उपस्थित राहणार असल्याचे मंदिराचे संचालक के. के. तिवारी यांनी सांगितले.