नाशिक – जेईई मेन्स परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व संबंधित पुढील जेईई अॅडव्हान्स या परीक्षेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा २७ सप्टेंबर (रविवार) रोजी होणार आहे. भारतातल्या २१२ शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी दोन सत्रात परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच २९ सप्टेंबर रोजी अन्सर की जाहीर केली जाणार आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा असल्याने दोन टप्यात परीक्षा घेतली जाणार आहे. सकाळी ९ ते १२ असा पहिला टप्पा तर २.३० ते ५.३० यावेळेत परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी देशातील २१२ परीक्षा केंद्र नक्की करण्यात आले आहे. २९ सप्टेंबरला सकाळी १० वाजता अधिकृत वेबसाईटवर अन्सर की जाहीर केली जाणार आहे. परीक्षेची काठिण्य पातळी लक्षात घेता जेईई अॅडव्हान्ससाठी मोजक्या विद्यार्थ्यांची निवड होत असते.
संबंधित परीक्षा केंद्रांवर ३ तास आधी टप्प्या टप्याने प्रवेश दिले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेत परीक्षा केंद्रांवर पोहोचणे अनिवार्य आहे. परीक्षा केंद्रावर उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही कारणास्तव परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही असे संबंधित परीक्षा मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
परीक्षा केंद्रावर जातांना…
प्रत्येक विद्यार्थ्याकडे मास्क तसेच हॅन्ड ग्लोज असणे अनिवार्य आहे त्याशिवाय परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणारा नाही. पाण्याची वयक्तिक ट्रान्स्परंट बाटली, छोटी सॅनिटायझरची बाटली सोबत असणे आवश्यक आहे. तसेच ओळखपत्र व संबंधित कागदपत्र सोबत ठेवावे अशी माहिती देण्यात आली आहे.