१० सप्टेंबर – जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन
—
आत्महत्या हा पलायनवाद ….
—-
लेखक – मुकुंद बाविस्कर, ज्येष्ठ पत्रकार, नाशिक.
…….
एकीकडे जगभरात कोरोनाचा कहर सुरू असतानाच दुसरीकडे आत्महत्या करण्याचे प्रकार देखील वाढत आहेत. कुठे शेतकरी आत्महत्या तर कुठे विद्यार्थी आत्महत्या, इतकेच नव्हे तर अभिनेता, अभिनेत्री, शासकीय अधिकारी, पोलिस कर्मचारी अशा विविध क्षेत्रातील लोकांच्या आत्महत्येच्या बातम्या आपण रोजच वाचत आणि ऐकत असतो. आत्महत्या ही जगभरातील एक गंभीर समस्या बनली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने २००३ पासून १० सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन’ म्हणून पाळण्याचे ठरविले आहे. ‘सब साथ काम करके आत्महत्या रोके’ असे यंदाचे घोषवाक्य आहे. एका जागतिक सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार अमेरिका, चीन, भारत यासह युरोपातील अनेक देशांत सुमारे १५ वर्षात आत्महत्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. तसेच आत्महत्या करण्याच्या प्रयत्नांमध्ये स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत तिप्पटीने पुढे आहेत. मात्र प्रत्यक्ष आत्महत्या यशस्वी ठरण्यात पुरुष स्त्रियांपेक्षा चार पटीने पुढे आहेत, असे एका अभ्यासानुसार आढळून आले आहे.
लोक आत्महत्या का करतात? याबद्दल जगभरात अनेक वेगवेगळे निष्कर्ष काढण्यात येतात. असाध्य रोगाला कंटाळून अनेक जण आत्महत्या करतात. दारू आणि आत्महत्या याचाही जवळचा संबंध आहे, असे देखील सांगण्यात येते, अविचाराच्या कृतीतून आत्महत्या घडून येते, अपेक्षाभंगामुळे किंवा जोडीदाराचे निधन झाल्यामुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण देखील जास्त असून काही वेळा एका आत्महत्येपाठोपाठ काही इतर आत्महत्याही घडून येतात. काही वेळा किरकोळ कारणामुळे होणाऱ्या आत्महत्या या टाळता येण्यासारख्या असतात. तरीही काही लोक निराशा आणि दुःख यावर उपाय म्हणून आत्महत्येचा मार्ग स्विकारतात. माणूस आत्महत्या का करतो? याबद्दल कोणी ठामपणे काही सांगू शकत नाही, मनोरुग्ण अथवा मनोविकार यातून आत्महत्या घडून येते, हे असे देखील सांगण्यात येते. परंतु सर्वच मनोरुग्ण आत्महत्या करतात असे नाही, पण आत्महत्या या शब्दाचा अर्थ स्वतः स्वतःचे जीवन संपवणे हा असला, तरी अशा तऱ्हेने जीवन संपवण्याचा निर्णय एखाद्या व्यक्तीने का घेतला आणि तो अमलात आणण्याच्या वेळी त्या व्यक्तीची मनस्थिती नेमकी कशी होती हे सांगणे अवघड असते. विशेषतः आत्महत्येच्या प्रयत्नातून वाचलेल्या व्यक्ती बरेचदा सुरुवातीला मला का वाचविले? असा प्रश्न करतात, परंतु यातून वाचलेल्या व्यक्ती मधून फारच थोड्या व्यक्ती पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न करतात, तसेच पूर्वीचा तो प्रयत्नही एक चूक होती, असे देखील या व्यक्ती सांगतात. मानव हा असा एकमेव प्राणी आहे की, तो आत्महत्या करतो असेही सांगण्यात येते. परंतु काही प्राणी आणि पक्षी देखील आत्महत्या करतात. मेंदूतील बिघाड किंवा चेतासंस्थेच्या बिघाडामुळे माणूस आत्महत्या करतो, असे एक कारण सांगितले जाते. परंतु सार्वत्रिक किंवा सर्वसमावेशक कारण म्हणून असे ठामपणे सांगता येणार नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, एखाद्या व्यक्तीने जाणून बुजून पूर्णतः विचारांती स्वतः स्वतःचे जीवन संपविण्याचा निर्णय घेणे किंवा इतर कुठल्याही व्यक्तीच्या मदतीशिवाय यशस्वीपणे अमलात आणणं म्हणजे आत्महत्या होय. परंतु स्वहस्ते स्वतःची जीवन यात्रा संपवणे म्हणजे आत्महत्या, अशी व्हू या मानसशास्त्रज्ञांची व्याख्या महत्त्वाची मानली जाते.
मेंदूतील बिघाडामुळे किंवा मनोविकारामुळे माणूस आत्महत्या करतो असे मानसशास्त्रज्ञांचे मत आहे. नैराश्यग्रस्त लोकांमध्ये आत्महत्येचा धोका २० टक्के असतो, यात ७ टक्के पुरुष तर १ टक्के महिला या आत्महत्या करतात, सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा नैराश्य आलेल्या लोकांमध्ये त्याचा धोका जास्त असतो, तसेच दारू व अन्य मादक पदार्थाचे व्यसन असेल तर हा धोका अधिक वाढतो, असेही मत काही अभ्यासक आणि संशोधक व्यक्त करतात, तसेच या विकाराची अनेक लक्षणे आहेत. यात प्रामुख्याने उगाच मन हळवे होणे, दु:खी होणे, पूर्वीचा आनंद वाटणाऱ्या गोष्टींमध्ये आनंद न वाटणे, खूप भूक वाढणे अथवा भूक मंदावणे, वजनात अचानक वाढ होणे किंवा वजन कमी होणे, जास्त झोप लागणे अथवा झोप न लागणे, अस्वस्थ वाटणे, चिडचिडपणा येणे, कायम थकल्यासारखे वाटणे, आयुष्य निरर्थक वाटणे, मन अशांत होणे, निर्णय न घेता येणे, वारंवार जीवन संपवण्याचा विचार मनात येणे, आदी लक्षणे दोन आठवड्यापासून जास्त काळ जर जवळपास दररोज आढळत असतील तर त्या व्यक्तीला नैराश्याचा विकार झाला, असे म्हणता येते. निराश झालेल्या व्यक्तीमध्ये आत्महत्या करण्यापूर्वी काही बदल व लक्षणे दिसून येतात. पण दुर्दैवाने त्याच्या परिवाराला आणि आसपासच्या व्यक्तींना त्याचे गांभीर्य लक्षात येत नाही. त्यातून मग आत्महत्या घडून येतात.
आत्महत्या टाळण्यासाठी नैराश्य व उदासीनता यासारख्या मनोविकारांवर प्रभावी उपचार मिळायला हवेत, दुसरे म्हणजे प्रशिक्षित समुपदेशक मनोविकार तज्ञांचा सल्ला घेणेही आवश्यक आहे. युरोप अमेरिकेसारख्या प्रगत देशात यासंबंधी हेल्पलाइन अस्तित्वात आहे, भारतात देखील काही ठिकाणी अशा प्रकारे समायोजक किंवा कौन्सिलर यांची नेमणूक करण्यात आलेली दिसून येते. समाजाचा मनोविकारांकडे बघण्याचा दृष्टीकोन दुषित असल्याने रुग्ण हा रोगाच्या प्राथमिक अवस्थेत मनोविकार तज्ज्ञाकडे जात नाही, म्हणून रुग्णांना कुटुंबात, समाजात आधार मिळायला हवा. कौटुंबिक संस्कार तसेच अध्यात्म, धर्म यातील काही शिकवण आत्महत्या करण्यापासून परावृत्त करू शकते, याचाही उपयोग करायला हवा.