हिसार – उत्तराखंडमधील चमोली येथे हिमकडा कोसळून झालेल्या जलप्रपातानं प्रत्येकाला हैराण केलं आहे. लोकांचा जीव वाचवण्यासाठी अजूनही बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेत हिसारची मुलगी डॉ. ज्योती यांनी असं काम केलं आहे, जे कधीही विसरले जाऊ शकत नाही. त्या ८ महिन्यांच्या गर्भवती असतानाही त्या मदतकार्यात सक्रीय आहेत. त्यामुळेच त्यांचे देशभरात कौतुक होत आहे.
इंडो-तिबेट सीमा दलात (आयटीबीपी) असिस्टंट कमांडंट पदावरील हिसारच्या सेक्टर १६-१७मधील राहणारी डॉ. ज्योती यांना जोशीमठमध्ये आयटीबीपीच्या रुग्णालयात नोव्हेंबरमध्ये तैनात करण्यात आलं होतं. जोशीमठ इथल्या आयटीबीपीच्या रुग्णालयात रोजच्याप्रमाणे त्या काम करत असताना त्यांना हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर वीज प्रकल्पाअंतर्गत तयार केल्या जाणार्या बोगद्यामध्ये काही लोक फसल्याची माहिती मिळाली.
रुग्णालयात दोन डॉक्टर होते. एक डॉक्टर बचावपथकासोबत बोगद्याकडे रवाना झाला. तर दुसऱ्या डॉक्टर ज्योती यांनी रुग्णालयात सूत्रं सांभाळली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे डॉ. ज्योती आठ महिन्यांच्या गर्भवती असतानाही त्यांनी ही सगळी धावपळ केली. यादरम्यान सुरुवातीच्या ४८ तासांमध्ये त्यांनी झोपल्याविना १२ मजुरांना वाचवण्याचा प्रयत्न केला. गर्भवती असल्यानं त्यांनी आराम करावा असं उपस्थित स्टाफच्या सहकार्यांनी त्यांना सुचवलं. मात्र लोकांचा जीव वाचवण्याच्या आपल्या कामाच्या प्रति निष्ठेनं त्या विनाथकता काम करत राहिल्या.

			








