कोविड -19 परिस्थितीबाबत पंतप्रधानांनी राज्य आणि जिल्हा अधिकाऱ्यांशी साधला संवाद
नवी दिल्ली,- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविड –19 परिस्थितीबाबत राज्य व जिल्हा अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या संवादा दरम्यान, अधिकाऱ्यांनी कोविड -19 विरुद्धच्या लढाईत पंतप्रधानांनी केलेल्या नेतृत्वाबद्दल त्यांचे आभार मानले. अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना आपापल्या जिल्ह्यातील सुधारत असलेल्या कोविड परिस्थितीची माहिती दिली. वास्तविक वेळेत देखरेख आणि क्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराचा अनुभव त्यांनी सामायिक केला. त्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये लोकसहभाग वाढवण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
यावेळी स्थानिक अनुभव आणि देश म्हणून एकत्र काम करण्याची गरज यावर पंतप्रधानांनी भर दिला. रुग्णसंख्या कमी होत असली तरीही गावे कोरोनामुक्त ठेवण्यासाठी आणि कोविड-योग्य वर्तनाचे पालन करण्याचे संदेश प्रसारित करण्याचे त्यांनी आवाहन केले. ग्रामीण व शहरी विशिष्ट मार्गाने रणनीती आखून ग्रामीण भारत कोविडमुक्त करण्याची सूचना पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना केली.
या प्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी प्रत्येकाला महामारीविरोधात लढा देण्यासाठी पूर्ण बांधिलकी सुनिश्चित करण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले, कोरोना विषाणूने काम अधिक आव्हानात्मक केले आहे. या नवीन आव्हानांच्या दरम्यान, नवीन रणनीती आणि उपाय आवश्यक आहेत. गेल्या काही दिवसात देशात सक्रिय रुग्ण कमी होण्यास सुरवात झाली आहे. परंतु हा संसर्ग किरकोळ प्रमाणातही अस्तित्त्वात असेपर्यंत आव्हान कायम असल्याचे त्यांनी बजावले.
महामारी विरुद्ध लढा देताना राज्य आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली आणि सांगितले की या क्षेत्रातील त्यांच्या कामाचे अनुभव व अभिप्रायांची व्यावहारिक व प्रभावी धोरणे बनवण्यात मदत होते. ते म्हणाले की, सर्व स्तरावर राज्ये व विविध हितधारकांच्या सूचनांचा समावेश करून लसीकरण धोरणही पुढे राबवले जात आहे.
पंतप्रधान म्हणाले की, प्रत्येक महामारीने, तिला सामोरे जाण्याच्या आपल्या पद्धतींमध्ये सतत नाविन्यपूर्ण संशोधन आणि बदल घडवून आणण्याचे महत्त्व आपल्याला शिकवले आहे. महामारीचा सामना करण्यासाठीच्या पद्धती व धोरणे गतीशील असावीत कारण विषाणू उत्परिवर्तन आणि स्वरूप बदलण्यात माहीर आहे यावर त्यांनी भर दिला. ते म्हणाले की विषाणू उत्परिवर्तन हा आता तरुण आणि मुलांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. त्यासाठी त्यांनी लसीकरण मोहिमेला चालना देण्यावर भर दिला.
लस वाया जाण्याबाबत पंतप्रधान म्हणाले, एका मात्रेचा अपव्यय म्हणजे एखाद्या व्यक्तीस आवश्यक ती सुरक्षा पुरवणे शक्य नाही. त्यामुळे त्यांनी लसीचा अपव्यय रोखण्याचे आवाहन केले. जीव वाचवताना नागरिकांचे जीवनमान सुलभ करण्याला प्राधान्य असल्यावर त्यांनी भर दिला. गरीबांना मोफत शिधाची सुविधा पुरवावी , इतर आवश्यक वस्तू पुरविल्या पाहिजेत आणि काळाबाजार थांबवायला हवे, असे ते म्हणाले. हा लढा जिंकण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठीही हे उपाय आवश्यक असल्याचे ते म्हणाले.