शहर गुन्हेशाखेची कामगिरी : दोघांना केली गुजरातमधून अटक
नाशिक- आठवडाभरापूर्वी भद्रकालीतील तिगरानिया रोडवरील इलेक्ट्राॅनिक वस्तूंचे गोदाम फोडून चोरट्यांनी तब्बल २२ लाख रुपयांचे सामान चोरून नेल्याचा प्रकार घडला असता, या गुन्ह्याची उकल नाशिक शहर गुन्हेशाखेने केली. या प्रकरणी पोलिसांनी गुजरातमधून दोघा अट्टल चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीच्या मालासह गुन्ह्यात वापरलेला ट्रकसह सुमारे ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
भद्रकालीतील तिगरानिया रोडवरील गोदावरी एआयटीसीतील मेक्सि डिस्ट्रिब्युटर्स प्रा.लि. या कंपनीचे गोदाम दि. २३ जुलैच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडले. यात चोरट्यांनी विविध कंपन्यांचे १३२ एलसीडी टीव्ही, एसी, रोकड असा २२ लाख एक हजार ७३१ रुपयांचा मुद्देमाल ट्रकमध्ये भरून पोबारा केला होता. या गुन्ह्याचा शोध गुन्हेशाखेच्या युनिक एक करीत होते. पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी केलेल्या तपासात संशयित हे गुजरातमधील असल्याचे समोर आले. त्यानुसार, पोलीस पंचमहल जिल्ह्यातील गोध्रापर्यंत पोहोचले आणि संशयित अश्फाक अब्दुला जबा (रा. धंतेया, अमीरपूर रोड, गोध्रा), खालिद याकूब चरखा (रा. गुहिया मोहल्ला, गोध्रा, जि. पंचमहल) या दोघांना शिताफीने अटक केली आहे. संशयितांकडून चोरीचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेला ट्रक असा ४१ लाख ८८ हजार ५२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याच संशयितांनी २१ जुलै रोजी सिन्नरच्या हद्दीतील एक टायर गोदाम फोडले असून, गुजरातमध्ये सुद्रनगरच्या पायला हद्दीतही टायरचे गोदाम फोडून लाखो रुपयांचे टायर चोरून नेले आहेत. संशयितांच्या अटकेमुळे तीन गुन्ह्यांची उकल झाली आहे. ही कामगिरी शहर गुन्हेशाखेचे उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक निरीक्षक महेश कुलकर्णी, हवालदार वसंत पांडव, शांताराम महाले, गणेश वडजे, राकेश हिरे, नाझिम पठाण, दत्तात्रय बोटे यांनी बजावली.