नवी दिल्ली – राज्यसभेत काल कृषी विषयक विधेयकांच्या मंजुरीच्या वेळी सभागृहात गदारोळ करणाऱ्या विरोधी पक्षांच्या ८ सदस्यांवर आज राज्यसभेचे सभापती एम. वेंकय्या नायडू यांनी कारवाईचा बडगा उगारत त्यांना एक आठवड्यासाठी निलंबित केलं. त्यापूर्वी प्रथम नायडू यांनी आज सकाळी विरोधकांनी उपसभापती हरिवंश यांच्याविरुद्ध अविश्वासाचा ठराव दाखल करण्यासाठी दिलेली नोटीस त्यासाठीची योग्य प्रक्रिया पद्धती अवलंबिली गेली नसल्याचं कारण देत फेटाळली.
त्यानंतर गोंधळ घालणाऱ्या सदस्यांवर निलंबनाची कारवाई करत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. या निलंबित सदस्यांमध्ये के. के. रागेश, डेरेक ओब्रायन, संजय सिंग, सैय्यद नझीर हुसेन, राजीव सताव, रिपुण बोरा, इल्माराम करीम आणि डोला सेन यांचा समावेश आहे.
त्यावेळी या कारवाईचा निषेध करत विरोधकांनी पुन्हा गोंधळ घातल्यानं राज्यसभेचं कामकाज सकाळी १० वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेच्या इतिहासातील हा अत्यंत काळा दिवस होता असं सांगत नायडू यांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली. मात्र, त्यानंतरही सदस्यांचा गोंधळ न थांबल्यानं कामकाज त्यानंतर साडेदहा वाजेपर्यंत, ११ वाजून ७ मिनिटांपर्यंत आणि नंतर सलग चौथ्यांदा दुपारी १२ वाजेपर्यंत वारंवार तहकूब करण्यात आलं.