नाशिक – राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) तब्बल १८ महिन्यांच्या कालावधीनंतर नाशिक ते पुणे महामार्गावरील आळेफाटा आणि खेड दरम्यानच्या रुंदीकरणाची कामे पुन्हा सुरू केली आहेत. येत्या महिनाभरात हे काम पूर्ण झाल्यावर नाशिक ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यास कोणताही अडथळा राहणार नाही.
एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, भूसंपादनाबाबत आणि सवलतींबाबतच्या समस्यांमुळे बायपास रस्त्याचे काम दीड वर्षाहून अधिक काळ प्रलंबित आहे. या रखडलेल्या कामांमुळे आळेफाटा आणि खेड दरम्यानच्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. रस्ता रुंदीकरण पूर्ण करण्यासाठी नवीन कंत्राटदार नेमले गेले आहेत. खेड ते मंचर बायपास दरम्यान काम सुरू झाले आहे, तर कळंब ते आळेफाटा बाय पास दरम्यान लवकरच काम हाती घेण्यात येणार आहे. खेड घाटाच्या पुनर्रचनेचे कामही पूर्ण झाले आहे, तर नारायणगाव बायपासचे काम पूर्णत्वास येत आहे. असेही ते म्हणाले.
तसेच त्यांनी सांगितले की, आळेफाटा ते खेड दरम्यानच्या महामार्गावरील रस्ता रुंदीकरणाच्या प्रक्रियेस अजून १ ते २ महिने लागतील. महामार्गावरील अपूर्ण कामांमुळे जुन्नरच्या आमदाराने दोन वर्षांपूर्वी चाळकवाडी टोल प्लाझा बंद केला होता.
या अधिकाऱ्याने सांगितले की, संबंधित ऑपरेटरला टोल ऑपरेशन पुन्हा सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. गेल्या एक दशकात नाशिक-पुणे महामार्गावर रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती उभारल्या गेल्या आहेत. त्यामुळे या महामार्गावर आता वाहनांची रहदारी वाढली आहे.