नाशिक – कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार असून अपप्रचाराला कोणी बळी पडू नये असे आवाहन भाजप नाशिक जिल्हा अध्यक्ष केदा आहेर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले की, केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठीच ३ विधेयके तयार केली आहेत. ही सर्व विधेयक शेतक-यांच्या फायद्याची आहे. यापुढेही सरकारकडून किमान आधारभूत किमतीला केली जाणारी शेतमाल खरेदी चालूच राहणार आहे.
आहेर म्हणाले की, शेतक-यांना आता आपला शेतीमाल कोठेही विकता येणार आहे. यापुढील काळात शेतमाल साठवणुकीची व्यवस्था गावपातळीवर करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना आपला माल बाजारातील परिस्थिती पाहून विक्रीसाठी आणता येणार आहे. कंत्राटी शेती ऐच्छिक स्वरूपाची असून याबाबतचे वाद सोडविताना शेतकऱ्यांचे हित जपले जाईल याला विधेयकात प्राधान्य देण्यात आले आहे. काँग्रेसची हरियाणात सत्ता असताना २००७ मध्ये कंत्राटी शेतीला सुरुवात झाली. काँग्रेसने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात शेतमाल विक्रीवरील बंधने हटविण्याचे आश्वासन दिले होते. हाच काँग्रेस पक्ष केवळ राजकीय विरोधासाठी या विधेयकांना विरोध करीत आहे. शेतकऱ्यांनी या अपप्रचाराला बळी पडू नये असे आवाहनही त्यांनी केले.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारने गेल्या ६ वर्षांत अनेक निर्णय घेतले आहेत. पीक विमा योजनेत बदल केल्यामुळे गेल्या ४ वर्षांत शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी ७७ हजार कोटींची भरपाई मिळाली आहे. डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. युपीए सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी अंमलात आणण्याची इच्छाशक्ती कधीच दाखविली नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या दिशेने या तीन विधेयकाच्या रूपाने निर्णायक पाऊल टाकण्यात आलेले असून ते शेतक-यांच्या फायद्याचे आहे.