नाशिक – शेतमाल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेली किसान रेल्वे आता आठवड्यातून दोनदा धावणार आहे. शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभल्याने रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. दर मंगळवारी आणि शुक्रवारी ही रेल्वे धावणार आहे. अवघ्या ३६ तासात तसेच कमी वाहतूक भाड्यामध्ये शेतमालाची गतिमान वाहतूक होत आहे.
आतापर्यंत देवळाली येथून किसान रेल्वेच्या तीन फेऱ्या झाल्या आहेत. प्रत्येक फेरीमध्ये शेतीमाल वाढत गेल्याने रेल्वेलाही आर्थिक फायदा होत आहे. आगामी काळात डाळिंब, द्राक्ष, टोमॅटो, कांदा आणि भाजीपाला यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढल्यास शेतकरी आपला शेतीमाल कमी वेळात थेट परराज्यात पाठवणे शक्य होत आहे. शेतकऱ्यांना शेतीमाल पाठविण्यासाठी त्याची पॅकिंग करावी लागते. तसेच पार्सल ऑफिसमध्ये आधारकार्डची झेरॉक्स देऊन नोंदणी करावी लागते.
कोल्हापूर, सांगोला या भागातील कृषिमालाच्या वाहतुकीसाठी रेल्वेनेे आता सांगोला ते मनमाडपर्यंत एक पार्सल ट्रेन सुरू केली असून ती मनमाड रेल्वेस्थाानकातून किसान रेलला जोडली जाणार आहे. त्यामुळे सांगोला येथूनही पार्सल ट्रेन शुक्रवार आणि मंगळवारी धावणार आहे. पंढरपूर, कुर्डुवाडी, दौंड, बेलवडी, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव असे थांबे राहणार आहेत.
दरम्यान, प्रतिसाद वाढत गेल्यास राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, आसाम, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्येही किसान रेल धावतील. उत्तम दर्जाची सुविधादेखील देण्यात येईल, असे रेल्वेचे वाणिज्य प्रबंधक कुंदन महापात्रा यांनी सांगितले.