नाशिक – केंद्र सरकारने घाऊक व्यापा-यांना २५ टन, तर किरकोळ व्यापार्यांना २ टन कांदा साठवणुकीची मर्यादा लादल्याने नाशिक जिल्ह्यातील व्यापा-यांनी सोमवारपासून लिलावात सहभागी न घेण्याचा पवित्रा घेतला. त्यानंतर या प्रश्नावर आता तोडगा काढण्यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न सुरु झाले. दरम्यान आज कांदा प्रश्नावर जिल्ह्यातील व्यापारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेणार आहे.
कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मध्यस्थीनंतर कांदा व्यापारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला मुंबईला रवाना झाले आहे. मुख्यमंत्री आणि कांदा व्यापाऱ्यांच्या या बैठकीकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे. बुधवारी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी या प्रश्नांवर शेतक-यांबरोबर चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्र्याबरोबर बोलण्याचे सांगितले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी सुध्दा या प्रश्नांत लक्ष घातले आहे.
केंद्र सरकारने निर्बंध मागे घ्यावे ही व्यापा-यांची भूमिका
केंद्र सरकारने व्यापा-यांवर कांदा साठवणुकीचे निर्बंध लादले. त्यामुळे आधीच खरेदी करून ठेवलेला कांदा पुढे पाठविण्यास अडचणी येत असल्याचे व्यापा-यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नवीन कांदा खरेदी करण्यासाठी व्यापा-यांनी असमर्थता दर्शविली. परिणामी, शेतक-यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. व्यापा-यांनी शेतकरी हिताचा विचार करून लिलावात सहभागी व्हावे, असे आवाहन सर्वांनी केले. परंतु, केंद्र सरकार जोपर्यंत साठवणुकीचे निर्बंध मागे घेत नाही तोपर्यंत लिलाव सुरू करणे अशक्य असल्याची भूमिका व्यापा-यांची आहे.