नाशिक – कडवा धरण भरल्यानंतर परिसरातील नागरीक व सरपंच यांनी कडवा धरणाचे पूजन केले.
कडवा हे दारणा समुहातील हे मोठे धरण आहे. हे धरण १६८८ दशलक्ष घनफूट क्षमतेचे असून ते शंभर टक्के भरले आहे. गेल्यावर्षी या कालावधीत धरणाचा साठा ९९ टक्के साठा होता, या तालुक्यात सरासरी ९९४.३७ मिलिमिटर पाऊस होतो. आजपर्यत तालुक्यात या महिन्यात एक हजार १५९ मिलिमिटर असा ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सरासरी ११७ टक्के पाऊस झाला. जून ते सप्टेंबर या कालावधीत तालुक्यातील पावसाची सरासरी तीन हजार ५५७ मि.मि.आहे. स्थानिक नागरिकांच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या पाटबंधारे प्रकल्पांनी अपेक्षित संचय क्षमता पूर्ण केल्यावर लोकप्रतिनिधी,नेत्यांच्या उपस्थितीत जलपूजन करण्याचा प्रघात आहे.
तीन महिन्यात २६७६ मि.मि.पाऊस
नाशिक जिल्ह्यातील धरण भरण्यास सुरुवात कडवा धरणाच्या वरच्या बाजूस भावली धरणाचे जलपूजन यापूर्वी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झाले होते. हे धरण मात्र खालच्या भागात असल्याने अजून त्यात अपेक्षित जलसाठा झाला नव्हता मागीलवर्षी येथे चार हजार २२१ मि.मि.पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा १ जून ते १० ऑगस्ट या कालावधीत २६७६ मि.मि.पाऊस झाला आहे.
शेतक-यांची चिंता दूर
धरण भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांची पाण्याची चिंता दूर झाली आहे, त्यामुळे पक्ष,संघटना बाजूला ठेवत येथील शेतकरी व सरपंचांनी एकत्र येत आपले स्थानिक राजकारण बाजूला ठेवून जलपूजन केले. यानिमित्ताने परिसरातील सर्व सरपंचात एकोपा निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.