नाशिक – सातपूर एमआयडीसी येथील केमिकल कंपनीतून येणाऱ्या धुरामुळे स्थानिक रहिवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने संबंधित रहिवास्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदन देण्यात आले. याप्रकरणी योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश भुजबळ यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना दिले आहेत.
रहिवाश्यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातपूर मधील श्रमिकनगर, शिवाजीनगर येथे राहणाऱ्या रहिवाश्यांना सातपूर एमआयडीमधील केमिकल कंपनीतील धुरामुळे त्रास सहन करावा लागतो. कंपनी व्यवस्थापनाशी वारंवार संपर्क साधूनही यावर कोणताही उपाय होत नसल्याचे दिसताच स्थानिक रहिवास्यांनी पालकमंत्र्यांकडे निवेदन दिले होते. कंपनीतून येणाऱ्या धुरामुळे परिसरात काजळी निर्माण होत असल्याने रहिवाशांना त्याच त्रास होत आहे. संबंधित प्रकारामुळे काही रहिवाशांना श्वसनाचा त्रास उद्भवला आहे. संबंधित कंपनीवर तत्काळ कारवाई करवी, अशी मागणी श्रमिकनगर व शिवाजीनगर येथील रहिवासी श्रीराम मंडळ, गुलाब बागुल, हनुमान सोनवणे, गोविंद माळी, पुष्पा खैरनार आदींनी केली आहे.