मुंबई – अभिनेत्री कंगना राणावत हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान तर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर सोमवारी गंभीर आरोप केले. तिच्या या ट्विटमुळे पुन्हा खळबळ माजली असून याप्रकरणी पुढे काय घडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मुंबईहून हिमाचल प्रदेशला परतताच कंगनाने ट्विट करुन सर्वत्र खळबळ माजवली आहे. आदित्य ठाकरे यांचे पहिल्यांदाच थेट नाव घेऊन तिने गंभीर आरोप केला आहे. तिने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची मूळ समस्या ही आहे की मी चित्रपट माफिया, सुशांतसिंग राजपूत याचे मारेकरी आणि त्यांच्या अंमली पदार्थाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ही सगळी मंडळी ही ठाकरे यांचे लाडके पुत्र आदित्य यांच्यासोबत असतात. हाच माझा मोठा अपराध आहे. म्हणूनच माझा बंदोबस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण ठीक आहे. आता बघूया की कोण कुणाचा बंदोबस्त करतो ते’
ट्विटद्वारे थेट मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुखांना आव्हान तसेच राज्याच्या विद्यमान मंत्र्यावर गंभीर आरोप झाल्याने महाविकास आघाडीच्या सरकारला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न कंगनाकडून सुरू असल्याचे बोलले जात आहे.