नाशिक – गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस असल्यामुळे रस्त्याची चाळण झाली असून वाहतूक करतांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांचे प्रलंबित असलेले काम तसेच वाहनांचे होणारे नुकसान लक्षात घेता निमातर्फे सातत्याने पाठपुरावा सुरु होता. निमा पदाधिकाऱ्यांनी शहर अभियंता संजय घुगे यांची भेट घेतली. त्यानंतर कामे त्वरित सुरु झाली आहेत.
गंगामाई औद्योगिक वसाहती समोरील रस्त्यांच्या डागडुजीचे काम आज (२० ऑगस्ट) सुरू करण्यात आले तसेच जेसीबीच्या साहाय्याने रस्त्याच्या कडेला असलेले नाले मोकळे करण्यात आले. याप्रश्नी निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव, मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, खजिनदार कैलास आहेर, संजय महाजन तसेच अंबडसाठी असलेल्या पायाभूत सुविधा समितीचे अध्यक्ष उत्तम दोंदे, गंगामाई औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष मंगेश बोरसे व मनपा अभियंता बच्छाव हे उपस्थित होते.