कोविड-१९ च्या रुग्णांच्या उपचारासाठी लागणारे ऑक्सीजन पुरवठा करतांना आवश्यक असणारी यंत्रणा योग्य प्रकारे कार्यान्वित राहावी यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. शिंगणे यांनी यावेळी केले. ते पुढे म्हणाले, राज्यातील ११ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता पडते आहे. याचं प्रमाण सुमारे ५०० मेट्रिक टन एवढे आहे तर सध्या एक हजार पेक्षा जास्त ऑक्सिजनचे उत्पादन होत आहे. तरीही काही ठिकाणी ऑक्सिजन मिळत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे सर्व पुरवठादार आणि वाहतुकदार यांनी आपले वितरणाचे जाळे वाढवून योग्य सहकार्य करुन गरजूंपर्यंत ऑक्सीजन पोहोचेल याची खबरदारी घ्यावी. या कामात काही अडचण असल्यास शासनातर्फे अडचण दूर करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. ऑक्सिजन पुरवठ्यासह मास्कच्या किंमती, सॅनिटायझरची उपलब्धता, रेमडेसिविर आणि इतर औषधे तसेच खासगी डॉक्टरांकडे उपलब्ध असलेला ऑक्सीजनचा साठा याचाही डॉ.शिंगणे यांनी सविस्तर आढावा घेतला.