मा. श्री. तुकाराम मुंडे.
दस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई
महोदय,
गेल्या काही दिवसापांसून वर्तमान पत्रात आणि दूरदर्शन मध्ये आपल्या बदलीची चर्चा रंगत आहे. बदली होण्यामागे भाजपच कारणीभूत आहे असे आपण मुलाखतीत सांगितले. आपल्या कार्यालयात महिलांना पाठवून कपडे फाडण्याचे प्रकार घडवले गेले. मानसिक खच्चीकरण केले. तसेच चारित्र्य हनन करण्यात आले, असे समजते. नागपुरात आयुक्तपदी असतांना आपण, स्थानिक लोकप्रतिनिधी, महापौर आणि नगरसेवकांचा विश्वास संपादन करू न शकल्याने आपली बदली करण्यात आली हे सत्य कोणीही नाकारणार नाही.
आपण पूर्वी नाशिक महानगरपालिका येथे आयुक्त असतांनाही आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींनी सत्तेचा वापर करत आपली बदली केली. मला आठवतं आपण नाशिक येथे आयुक्त असतांना अतिशय पारदर्शकपणे कुठेही भ्रष्टाचार न होऊ देता महापालिका क्षेत्रात चांगले काम केले. आपल्या काळात महापालिका कर्मचारी वर्गाचे वेळेवर कार्यालयात येणे, शहराची स्वच्छता, आरोग्य विभागाचे कामकाज सगळ्यां गोष्टींची वाहवा होती. फक्त काही लोकप्रतिनिधींच्या अवास्तव कामांना विरोध केल्याने आपली बदली करण्यात आली. यामुळे महापालिकेचे जे काही नुकसान व्हायचे ते झाले. पण अशाने लोकांना काहीच फरक पडत नाही, हे ही तेवढेच खरे. तेव्हा आपण आपल्या मूळ स्वभावात बदल करून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या सोबत समन्वय साधून आपला हेतू साध्य करत आपला शासकीय आलेख सतत उंचावत ठेवावा, अशी विनंती वजा सूचना करते.
शासनाच्या नियमानुसार बदली होणे एक भाग तर विनाकारण बदली होणे केवळ दुर्दैव. आपल्या सततच्या बदलीमुंळे कुटुंबाला मनस्ताप होत असेल याचाही विचार करावा. मुलांच्या या वयातील मैत्रित अडथळा येत असेल. वारंवार शिक्षणाची हेळसांड होत असेल. या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही आयुक्त पदावर असाल किंवा नसाल कोणीलाही काही देणे घेणे नाही हा विचार करून उर्वरित आयुष्य कुटुंबाला प्राधान्य देत शासनाच्या नियमांचे पालन करून सुखी समाधानाने जगा. आपली बदली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबई खात्यात सदस्य सचिव पदी झाली हे वाचनात आले. पाण्याशी निगडीत खाते आहे. पाण्याला रंग, चव, रूप काहीही नाही. तेव्हा पाण्याशी साधर्म्य राखत पाण्यासोबत मिसळा. सध्या आपण कोरोना रोगाशी लढा देत आहात, तेव्हा काळजी घ्यावी. आपण लवकर बरे होऊन पुन्हा शासनाच्या सेवेसाठी रूजू व्हाल आणि जीवन प्राधिकरण खात्यात आपला कार्यकाळ पूर्ण कराल या माझ्या, कुटुंबाच्या वतीने शुभेच्छा देते.
आनेवाला पल जानेवाला है, हो सके तो इसमें जिंदगी बिता दो, पल जो ये जानेवाला है!
– अनिता महेश भामरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, नाशिक