रोपवाटिकेतून हरितक्रांती
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एक महिन्याच्या रोपवाटिका शिबिरात त्यांनी सहभाग घेतला. आणि तोच त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. महाराष्ट्रासह आसपासच्या चार राज्यांत भाजीपाला रोपवाटिकेच्या माध्यमातून विस्तार करत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. याशिवाय, लाखो शेतकऱ्यांच्या आयुष्यात नवसंजीवनी आणत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यास हातभारही लावला. या व्यक्तीचे नाव आहे दत्तू रामभाऊ ढगे…
करिअरमध्ये भौगोलिक प्रदेशांच्या सीमा ओलांडणे केवळ शिक्षण पद्धतीवर अवलंबून नाही. ध्येय आणि आत्मविश्वास यांची सांगड घातल्यास दूरस्थ शिक्षण पद्धतीही नेत्वृत्वाला पूरक ठरू शकते. याचा प्रत्यय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी दत्तू रामभाऊ ढगे यांना आला. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेतर्फे ‘कृषी क्षेत्रातील नावीन्यपूर्ण प्रयोग’ या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा दिल्लीमध्ये अलीकडेच पार पडली. त्यात कृषी विज्ञान केंद्रासह राज्याचेही प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान त्यांना मिळाला.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा एक महिन्याचे रोपवाटिका शिबिरात सहभाग घेतला. येथे मिळालेल्या तंत्रशुद्ध माहितीमुळे दिशा मिळाली आणि दत्तू रामभाऊ ढगे यांच्या जीवनाला वेगळी दिशा मिळाली. एक महिन्याचे शिबिर टर्निंग पॉईट ठरले. नाशिक परिसरात भाजीपाल्याची स्वतंत्र रोपवाटिका नव्हती. ती आपण सुरु करावी असा विचार करून त्यांनी त्यादिशेने वाटचाल सुरु केली. लोक हसू लागले. टिंगल करायचे. भाजीपाल्याची अन रोपवाटिका ? असा प्रश्न विचारून वेड्यात काढायचे. मात्र खचून न जाता व्यवसायात उडी घेतली.
२००६ मध्ये जुन्या वापरात नसलेल्या द्राक्षाच्या अॅगलचा उपयोग करून १०बाय ४ फुटाच्या पॉली टनेल शेडमध्ये रोपवाटिकेची सुरुवात केली. घरच्या घरीच रोपे बनवली. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन रोपे तयार केली जाऊ लागली. सुरुवात २० हजार रोपांनी केली. गावातील आणि आजूबाजूचे शेतकरी येऊ लागले. नंतर मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने टप्याटप्याने वाढ करत आता ७० गुंठ्यांवर पॉली हाऊस उभारण्यात आले आहे. टोमॅटो, सिमला, ज्वाला मिरची, पिक्याडो, वांगी, कारले, भोपळे, दोडके, गिलके, काकडी, टरबूज, खरबूज, भेंडी, फ्लॉवर, कोबी, वाल त्याचप्रमाणे परदेशी भाजीपाल्यांच्या विविध व्हरायटी मिळून जवळपास १५० प्रकारची महिन्याकाठी सुमारे २२ लाख रोपे तयार केली जातात.
प्रत्येकात क्षमता दडलेली असते. ती सादर करण्यासाठी संधी आणि आत्मविश्वासाची गरज असते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ‘रोपवाटिका व्यवस्थापन’ प्रशिक्षणामुळे मला राष्ट्रीय स्तरावर स्वतःला मांडण्याची संधी मिळाली, असे दत्तू ढगे हे अभिमानाने सांगतात.
सात-आठ वर्षांपूर्वी त्र्यंबक भागातील लोक शेतीत काही होत नसल्याने भाताचे पिक घेतल्यानंतर रोजगारासाठी इतरत्र जात. तर कित्येक जण स्थलांतर करीत. अनेक जण जमिनी विकत. मात्र या रोपवाटिकेमुळे आता या भागातील लोक भाजीपाला पिकाकडे वळले. कमी पाण्यावर भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली. लोकांत शेतीची आवड निर्माण झाली. महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्यप्रदेशातील शेतकरी येथून रोपे घेऊन जातात. त्यांचे राज्यातील तसेच राज्याबाहेरील प्रगतशील शेतकऱ्यांशी आपुलकीचे आणि स्नेहाचे संबंध जोडले गेले. त्यामुळे सातत्याने नवनवीन प्रयोग चालू आहे. कोलंबो, श्रीलंका आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांनीही येथे भेटी दिल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
भारतीय कृषी अनुसंधान परिषद कार्यशाळेत दत्तू ढगे यांनी ‘कमी खर्चाच्या हरितगृहात मोठ्या प्रमाणातील भाजीपाला रोपे निर्मिती’ या विषयावर यशस्वी सादरीकरण केले. संशोधन व कृषी उत्पादन यामध्ये केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल देशातील ५१ संशोधक शेतकऱ्यांचा गौरव मुख्यमंत्री पुथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आला. देशातील ५१ शेतकऱ्यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यामध्ये राज्यातील तीन शेतकरी व अभिनव ग्रुपचा समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील धान पिकात एचएमटी वाणाचे संशोधन करणारे देवाजी खोब्रागडे, पशुपालन व्यवसायात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील प्रभाकर गणपत गुवडकर, फळबाग क्षेत्रात देशात वेगळा ठसा उमटविणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील दत्ताजी ढगे आणि कृषी मालाच्या मार्केटींगमध्ये विशेष काम करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील अभिनव ग्रुपचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गौरव केला.
दत्तू यांच्या आगामी योजना
- रानावनातील दुर्मिळ आणि नामशेष होत चाललेल्या त्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न.
- शेतकऱ्यांबरोबरच शहरी लोकांनाही भाजीपाल्याची आवड रुजावी. ताजा भाजीपाला मिळावा या हेतूने फुल, फळ आणि भाजीपाला शेती विकसित करणार. जेणेकरून घरातल्या घरात भाजीपाला सहजतेने उपलब्ध होऊ शकेल.
- आरोग्य आणि पर्यावरण उत्तम राहण्यासाठी घराच्या अथवा बंगल्याच्या सुशोभीकरणासाठी अन्य झाडांची निवड करण्यापेक्षा तुळशीच्या कुंपणाची लागवड करावी यासाठी प्रयत्न करणार.
- औषधी वनस्पतींचे संवर्धन करणे.