नाशिक – देवळाली कॅम्प येथील गुरुद्वारा रोडवर कॅन्टोन्मेंट बोर्डाने साकारलेल्या कोविड सेंटरमधील ६० बेड धुळखात पडले असल्याची बाब समोर आली आहे. परिसरातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता हे सेंटर कार्यन्वित करण्यात आले. पूर्वी बेड नव्हते आणि बेडची उपलब्धता झाली तर आता डॉक्टर व कर्मचाऱ्यांची प्रतिक्षा आहे.
देवळाली कॅन्टॉन्मेंट बोर्ड परिसरातील वाढत्या रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढत असल्याने बोर्डाने १०० बेडचे कोविड सेंटर साकारले आहे. बोर्ड परिसरातील कोरोना बाधितांची संख्या ८८५ झाली आहे. कॅन्टॉन्मेंट बोर्ड हॉस्पिटलमध्ये एकूण ७० बेड आहेत. मात्र, नव्या कोविड सेंटरमध्ये डॉक्टर, नर्स व वैद्यकीय कर्मचारी नसल्याने १०० पैकी ६० बेड धुळखात पडल्याचे चित्र आहे. याठिकाणी उपचारार्थ दाखल होणाऱ्या २० रुग्णांसाठी तब्बल एकच डॉक्टर असल्याचे निदर्शनास आले आहे. नाशिक शहरातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा स्थितीत तातडीने डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली जात आहे. यापूर्वीही यासंदर्भात पाठपुरावा करण्यात आला पण त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास येत आहे.
—
गेल्या सहा महिन्यात सरकारने केवळ ३० लाख रुपये दिले आहेत. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्ड आर्थिक संकटात आहे. त्यातच आता बेड रिकामे आहेत. त्यामुळे सरकारने तात्काळ डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी येथे उपलब्ध करुन द्यावेत.
– भगवान कटारिया, माजी उपाध्यक्ष