नाशिक – ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांची आदिवासी विकास आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. हिरालाल सोनवणे हे २०१० च्या भारतीय प्रशासन सेवेचे अधिकारी आहेत. यापूर्वी ते कोकण विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते.
सोनवणे हे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील काळखेडे येथील रहिवाशी आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत त्यांची १९९२ मध्ये उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाली. हिरालाल सोनवणे यांनी जिल्हा परिषद शाळेमधून प्राथमिक शिक्षण काळखेडे ,वाघारी येथून, तर माध्यमिक शिक्षण शिवाजी हायस्कूल पारोळा येथून घेतले. गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक येथून डिप्लोमा इन फार्मसी हा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर पुणे विद्यापीठातून बी.ए, व एम.ए चे शिक्षण पुणे येथे पूर्ण केले. त्यानंतर नोकरीत असताना मुंबई येथील सिद्धार्थ कॉलेज मध्ये एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले.
१९९०-१९९२ या कालावधीमध्ये आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी म्हणून परिविक्षाधीन अधिकारी म्हणून रावेर जिल्हा जळगाव येथे कार्यरत होते. त्यानंतर प्रांताधिकारी, नंदूरबार व प्रांताधिकारी शिरपूर या पदावर देखील कामकाज केले .पुढे खाजगी सचिव म्हणून मंत्रालयात कार्यरत होते . त्यानंतर मुद्रांक जिल्हाधिकारी मुंबई शहर, अपर जिल्हाधिकारी मुंबई, नियंत्रक अतिक्रमण व निष्कासन बांद्रा, अपर विभागीय आयुक्त नाशिक अशा विविध पदावर काम केले आहे.