मुंबई – कोरोनाच्या संकटकाळात संधी साधून लूट करणाऱ्यांचा सुळसुळाट झाला असून सिटीस्कॅनसाठी तब्बल १० हजार रुपये उकळले जात असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. कोरोनाग्रस्तांना दिलासा देण्याऐवजी त्यांची भरमसाठ लूट करण्याच्या या प्रकाराने सर्वसामान्य जनता प्रचंड होरपळली आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडेही प्रचंड तक्रारी येत आहेत. अवघ्या काही २ ते ३ हजारात होणारे सिटीस्कॅन थेट दहा हजारांना केले जात असल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण आहे. याची दखल राज्य सरकारने घेतली आहे.
दरासाठी समितीची स्थापना
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सिटीस्कॅन चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. सात दिवसात समिती अहवाल सादर करेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
यासंदर्भात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदिप व्यास यांच्या स्वाक्षरीने शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे. यापूर्वीदेखील कोरोना आणि इतर रुग्णांच्या तपासणीसाठी खासगी रुग्णालयांनी आकारावयाचे दर तसेच खासगी प्रयोगशाळांनी आरटीपीसीआर, रॅपीड ॲण्टी जेन, ॲण्टी बॉडीज चाचण्यांसाठीचे दर निश्चित केले आहेत.
कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी सिटीस्कॅनसारख्या चाचणीची देखील आवश्यकता भासते. त्यासाठी खासगी रुग्णालये किंवा सिटीस्कॅन सुविधा असलेल्या केंद्रांकडून अवाजवी रक्कम आकारण्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यासाठी एचआरसीटी चाचण्यांचे दर निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
डॉ.शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत एलटी वैद्यकीय महाविद्यालय आणि सायन रुग्णालयाच्या रेडीऑलॉजी विभाग प्रमुख डॉ.अनघा जोशी, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता हे सदस्य असून आरोग्य संचालक हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. ही समिती एचआरसीटी चाचणीच्या दर निश्चितीसाठी खासगी रुग्णालये व एचआरसीटी चाचणी केंद्रांशी चर्चा करुन सात दिवसात शासनाला अहवाल सादर करेल.