नाशिक – अत्यावश्यक सेवेतील चाकरमान्यांना दररोज मुंबईत जावे लागत असल्याने त्यांच्या सोयीसाठी पंचवटी एक्सप्रेस पुन्हा सुरु करण्यात यावी, अशी आग्रही मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी आज (१२ ऑगस्ट) मध्य रेल्वे विभागाचे विभागीय प्रबंधक शैलभ गोयल यांच्याकडे केली. खासदार गोडसे यांची मागणी न्यायिक असून पंचवटी सुपरफास्ट एक्सप्रेस लवकरच सुरु करण्यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही महाप्रबंधक दिनेश वशिष्ठ यांनी दिली आहे.
खासदार गोडसे यांनी गोयल यांना दिलेल्या निवादनात म्हटले आहे की, कोरोना संकट काळात सुरक्षेच्या कारणास्तव लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे प्रवासी वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली आहे. यात नाशिककरांचा महत्त्वाचा घटक असलेली मनमाड – मुंबई (पंचवटी सुपरफास्ट) एक्सप्रेस देखील बंद करण्यात आली. मात्र, अत्यावश्यक सेवेतील हजारो कर्मचाऱ्यांना दररोज नोकरीनिमित्त मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुबंई आदी शहराकडे येत असतात. त्यांना येण्या – जाण्यासाठी सोय नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांना आर्थिक भुर्दंड सहन करीत मुंबई गाठावी लागत होती. यामुळे पैसे व वेळेचा देखील अपव्यव होत होता. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना अपडॉउन करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा घटक असलेली पंचवटी एक्सप्रेस पुन्हा सुरु करावी, अशी मागणी चाकरमान्यासह जिल्हावासियांकडून सतत करण्यात येत आहे.
प्रवाशांची मागणीची दखल घेत खासदार गोडसे यांनी मध्य रेल्वे प्रशासनाची भेट घेत पंचवटी सुपरफास्ट एक्सप्रेस पुन्हा पुर्ववत करण्यासदंर्भात चर्चा केली. यावेळी उपमहाप्रबंधक दिनेश वशिष्ठ यांनी निवेदन स्विकारले. तसेच पंचवटी सुपरफास्ट एक्सप्रेस लवकरच वरिष्ठांशी चर्चा करुन लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.