श्याम उगले, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक – जवळपास साडेतीन वर्षांपासून लांबलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेला अखेर प्रारंभ झाला आहे. राज्याचे ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी राज्यपालांच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हा निवडणूक अधिका-यांना गट, गण प्रारुप रचना करण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्यानुसार सर्व जिल्हा निवडणूक अधिका-यांनी १८ ऑगस्टपर्यंत गट-गण रचना निश्चित करून राज्य निवडणूक अधिकारी यांना पाठवण्याच्याही सूचना दिल्या आहेत. त्यानंतर आरक्षण निश्चिती होऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे.
राज्यातील ३२ जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका मार्च २०२२ मध्ये प्रस्तावित असताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीची संख्या निश्चित नसणे व ओबीसींना २७ टक्के राजकीय आरक्षण दिल्यास आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली जाते, या कारणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केले होते. यामुळे ओबीसींना राजकीय आरक्षण मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. परिणामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका साडेतीन वर्षांपासून लांबल्या होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नोकरशाहीची प्रशासकीय राजवट असल्याने तेच धोरणात्मक निर्णय घेत असल्याच्या कारणावरून सर्वोच्च नायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०२२ पूर्वीच्या आरक्षण पद्धतीनुसार घेण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. तसेच या निवडणुकांची प्रक्रिया चार महिन्यांत राबवण्याचेही आदेश दिले आहेत. त्यानुसार या आठवड्यात महानगर पालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश दिल्यानंतर १२ जून रोजी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची गट-गण रचना करण्याच्या सूचना सर्व जिल्हा निवडणूक अधिका-यांना दिल्या आहेत.
..
असे आहे वेळापत्रक
प्रारुप गट-गण रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करणे – १४ जुलै २०२५ पर्यंत
प्रारुप गट-गण रचनेला हरकती घेणे – २१ जुलै २०२५ पर्यंत
विभागीय आयुक्तांना हरकतींचा प्रस्ताव सादर करणे – २८ जुलै २०२५ पर्यंत
विभागीय आयुक्तांकडे हरकतींवर सुनावणी – ११ ऑगस्ट २०२५ पर्यंत
अंतिम गट-गण रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाला सादर करणे – १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत
..
नाशिक जिल्ह्यात ७४ गट
नाशिक जिल्हा परिषदेत २०१७ च्या पंचवार्षिक निवडणुकीत ७३ जिल्हा परिषद गट व १४६ गण होते. दरम्यानच्या काळात ओझर ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रुपांतर झाल्याने एक गट कमी होऊन गटांची संख्या ७२ झाली. दरम्यान निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत या ग्रामपंचायतीचेही नगरपरिषदेत रुपांतर झाल्याने आणखी एक गट कमी झाला. यामुळे २०११ च्या जनगणनेच्या आधारे गट-गण रचना जाहीर केल्यास गटांची संख्या ७१ होईल, असे मानले जात होते. मात्र, ग्रामविकास विभागाच्या पत्रात नाशिक जिल्हापरिषदेच्या गट व गणांची संख्या अनुक्रमे ७४ व १४८ जाहीर केली आहे. मालेगाव, चांदवड व सुरगाणा या तालुक्यांत प्रत्येकी एक गट व दोन गण वाढवण्यात आले आहेत. या नवीन आकडेवारीवरून निफाड तालुक्यातील गटांची संख्या दोनने कमी होऊन ८ झाली आहे, तर मालेगाव तालुक्यातील गटांची संख्या ८, चांदवड तालुक्यातील गटांची संख्या ५ व सुरगाणा तालुक्यातील गटांची संख्या ४ करण्यात आली आहे.
—
shaymugale74@gmail.com