नाशिक – एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक द्वारा पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत जिल्ह्यातील आदिवासी युवक व युवतींसाठी एक महिना निशुल्क निवासी वाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्या अनुषंगाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या नाशिक, निफाड, येवला, सिन्नर, इगतपुरी, पेठ व त्र्यंबकेश्वर या तालुक्यातील युवक व युवतींनी प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन नाशिक महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे, प्रकल्प अधिकारी संजय भामरे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, निवासी वाईन प्रशिक्षणाचा कालावधी साधारण एक महिना असणार असून, कोविडची लस घेणाऱ्यांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी शैक्षणिक अर्हता विज्ञान शाखेत 12 वी पास व वयामर्यादा 18 ते 45 असणे आवाश्यक आहे. या प्रशिक्षणांतर्गत द्राक्षापासून वाईन तयार करण्याचे तांत्रिक व प्रात्याक्षिक प्रशिक्षण, महाराष्ट्राचे वाईन धोरण, वाईन उद्योगासाठी सहाय्यभूत शासनाच्या विविध योजना, उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, बाजारपेठ सर्वेक्षण, प्रकल्प अहवाल, व्यवस्थापन व विक्री कौशल्य, डिजीटल मार्केटींग इत्यादी विषयांवर तज्ज्ञांच्या माधमातून मार्गदर्शन केले जाणार आहे.
निवासी वाईन प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी ईच्छुक युवक व युवतींनी www.mced.co.in व https://mced.co.in/Training_Details/?id=780 या संकेतस्थळावर अर्ज सादर करावयाचा आहे. त्यासाठी विज्ञान शाखेत 12 वी पास असण्याचे पमाणपत्र, वयाचा दाखला, आधार कार्ड, अनुसूचित जमाती दाखला, कोविड लस घेतल्याचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र अर्ज भरतांना सादर करणे आवश्यक आहे.
या प्रशिक्षणाबाबत अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी, यांचा भ्रमणध्वणी क्रमांक 7720075901 तसेच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, 11 उद्योग भवन, शासकीय आय.टी.आय जवळ, त्र्यंबक रोड, नाशिक या ठिकाणी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असेही प्रकल्प अधिकारी संजय भामरे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.