रुद्रप्रयाग (उत्तराखंड) – परिस्थिती माणसाला सगळं काही शिकवते असं म्हणतात. नेमका हाच अनुभव जिल्ह्यातील सौड उमरेला येथील बबिता रावत हिला आला. लहान वयातच अंगावर पडलेली घराची जबाबदारी, आपल्या पाठच्या भावंडांचं शिक्षण, स्वतःचं शिक्षण, वडिलांचं आजारपण, अशा सगळ्या जबाबदाऱ्या तिने उत्कृष्टरीतीने पेलल्या. त्यात ती यशस्वीही झाली. एवढंच नव्हे, तर आज ती इतर बायकांसाठी आदर्श बनली असून, त्यांनाही ही स्वावलंबन आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे महत्त्व पटवून देते आहे.
बबिता अवघ्या 13 वर्षांची असताना तिचे वडील सुरेंद्र सिंह रावत यांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यांनी अंथरूण धरलं. घरातील मोठी असल्याकारणाने घराच्या बरोबरच 6 भावंडांची जबाबदारी देखील तिच्यावर आली. पण परिस्थितीसमोर खचून न जाता बबिताने मोठ्या धीराने त्याचा सामना केला.
स्वतः जमिनीत नांगर चालवून, ती कसून शेती योग्य बनवली. मग तिथे विविध प्रकारच्या भाज्या, मशरूम पिकवले. आणि त्यात यशस्वी देखील झाली. वडील आजारी पडल्यानंतर तिने स्वतः शेतात जायला सुरुवात केली. सकाळी शेतात काम करून दुपारी ती 5 किमी. चालत जाऊन कॉलेजचे शिक्षण पूर्ण करणे असे. इथेही आल्यावर ती शांत बसत नसे तर सोबत विक्रीसाठी दूध आणत असे. दिवसरात्र एक करत केलेल्या या मेहनतीचे फळही तिला मिळाले. तिने पदव्युत्तर शिक्षण घेतले.
परिस्थिती जशी सुधारली तसं तिने शेतीत अधिक लक्ष घालायला सुरुवात केली. दोन वर्षांपासून ती मशरूमचे उत्पादन घेत असून यातून तिला महिन्याला 8 ते 10 हजार रुपये मिळतात. विशेष म्हणजे, तिची ही संघर्ष कथा लोकप्रिय आहे. मात्र, कोणतीही प्रशासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी तिच्या मदतीला आले नाहीत. तरीही हार न मानता बबिता तिच्या ध्येयाकडे वाटचाल करतेच आहे.