अजय सोनवणे-
येवला – ७० फुट खोल पाण्याच्या विहिरीत पडलेल्या काळविटाला वाचविण्यात येऊन त्याला जीवदान देण्यात येवला वनविभागाला यश आले आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील मोठ्या संख्येने हरणांचे वास्तव्य आहे, उन्हाळ्यात अन्न-पाण्यासाठी हरणांचे कळप तालुक्यातील अनेक गावात फिरतांना दिसून येतात, तालुक्यातील देशमाने येथिल भिमाबाई शिवदे यांच्या शेतात असलेल्या खोल विहिरीतीतील पाण्यात काळविट पडल्याच समजताच त्यांनी याची माहिती स्थानिकांना दिल्यानंतर तातडीने येवला येथील वनविभागाला याबाबत कळविण्यात आले. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रेस्क्यु ऑपरेशन राबविले, खोल विहिरीत दोघे जण उतरत खाट सोडण्यात आले, मात्र भेदरलेला काळवीट खाटेवर येऊन पुन्हा पाण्यात पडत असल्याने तिसऱ्या प्रयत्नात अखेर काळिटाला बाहेर काढण्यात येऊन त्याला जीवदान देण्यात यश आले. काळविटाला बाहेर काढताच त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. बाहेर येताच काळविटाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.