इंफाळ () – संपूर्ण भारतात रेल्वेचे जाळे निर्माण व्हावे, यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून प्रतिकूल भौगोलीक परिस्थितीत काश्मीर प्रमाणेच ईशान्य भारतातील राज्यांमध्ये देखील रेल्वे मार्ग टाकण्यात येत आहे. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल ईशान्य भारतात बांधला जात आहे. त्याची उंची १४१ मीटर असणार आहे, म्हणजे तो कुतुबमिनारच्या जवळपास दुप्पट उंच आहे.
सुमारे ११० कि.मी. लांबीच्या जिरीबाम-इम्फाळ रेल्वे लाईन प्रकल्पाअंतर्गत मणिपूर मधील काही जिल्ह्यात हे बांधले पूल जात आहे. या परिसराचा इको सेन्सेटिव्ह झोन असल्याने हा पूल भूकंप प्रतिरोधक बनवला जात आहे. हे रिश्टर स्केलवर ८.५ तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के सहज सहन करू शकते. हा प्रकल्प डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण होईल, असे सांगण्यात येते.
ईशान्य फ्रंटियर रेल्वे झोनच्या अधिकार्यांनी सांगितले की, जिरीबाम-इम्फाळ प्रकल्पाच्या विभागात बेगायचंपो मध्ये १२ कि.मी.चा ट्रॅक टाकण्यात आला आहे. या विभागावर रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मणिपूरची मोठी लोकसंख्या इंफाळमध्ये राहते. या मार्गावर धावणाऱ्या मालगाड्यांमुळे नागरिकांना आवश्यक अन्नपदार्थ, औषधे, पेट्रोलियम उत्पादने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा जलद पुरवठा करणे शक्य होईल.
या रेल्वे ब्रिज प्रकल्पाचे प्रभारी संदीप शर्मा यांनी सांगितले की, जिरीबाम-इम्फाळ प्रकल्पावर १५१ छोटे-मोठे रेल्वे पूल बांधले जात आहेत. यामध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पुलासाठी सात खांब उभारले जात आहेत. पाच खांब बांधण्यात आले असून दोन खांबांचे काम सुरू आहे. दोन्ही खांबांची उंची १४१ मीटर आहे. बाकीचे यापेक्षा लहान आहेत.
रेल्वे ट्रॅक टाकण्यासाठी खांबाच्या वर आणखी एक रचना ठेवण्यात येणार आहे, त्यामुळे हा पूल कुतुबमिनारपेक्षा दुप्पट होईल. या पुलाची लांबी ७०३ मीटर आहे. या प्रकल्पात ४६ बोगदे बांधण्यात येणार आहेत. जिरीबाम-इम्फाळ प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत १४,३२२ कोटी रुपये असेल. यामध्ये सुमारे ११ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. यामुळे मणिपूर-आसाम दरम्यान रेल्वे कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे.