रायपूर (झारखंड) – कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी सध्या देशभरात लसीकरण मोहीम सुरू आहे. काही राज्यांमध्ये लसीकरणाला वेग आहे तर अद्याप काही राज्यांमध्ये लसीकरण पहिल्या टप्प्यातच आहे. लसीकरण करताना आरोग्य कर्मचाऱ्यांना नियमावली देण्यात येते. त्यानुसारच लसीचा डोस द्यावेत, असे सांगण्यात येते. परंतु काही वेळा लसीचा डोस देताना गोंधळ उडतो. अशीच एक घटना झारखंडमध्ये घडली आहे एका महिलेला १० मिनिटाच्या अंतराने लसींचे चक्क दोन डोस देण्यात आले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
झारखंडमधील गोड्डा येथील पोडायहाट भागातील देवदंड प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत खेड्यातील एका महिलेला एकाच वेळी लसीचे दोन डोस दिले गेले. ही बाब सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. त्यातूनच ती उघडकीस आली. देवदंड भागातील रहिवासी असलेली महिला बुलबुल दत्त म्हणाली की, याबाबत त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना अनेक वेळा सांगितले तरी सुद्धा तिला पुन्हा लस देण्यात आली. तिचे पती संजय दत्त यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या पत्नीला दहा मिनिटांच्या अंतराने कोविड लसीचे दोन डोस आरोग्य कर्मचारी महिलेने दिले.
आता कोविडचा डबल डोस दिल्यानंतर सोशल मीडियावर ही बाब चर्चेचा विषय बनली आहे. या घटनेनंतर महिलेला दोनदा लसीकरण केल्याचा मानसिक धक्का बसला आहे. या संदर्भात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधला. परंतु यासंदर्भात कोणत्याही अधिकाऱ्यांकडून कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही.