नागपूर – ‘आला हिवाळा आरोग्य सांभाळा’ असे म्हटले जाते. वास्तविक हिवाळा हा आरोग्यासाठी पोशाख ऋतू असला तरी त्यामध्ये सर्दी, खोकला यासारखे आजार उद्भवतात. त्यामुळे आरोग्यपूर्ण जीवनशैली साठी वेगवेगळे पौष्टिक पदार्थ खाणे आवश्यक आहे. तसेच आहारात लसूण, जिरे, आले (अद्रक) यासारख्या पदार्थांचा उपयोग करणे आवश्यक आहे. लसणाचा वापर आपल्या रोजच्या भाजी मधून होतच असतो. परंतु लसणाचे लोणचे देखील अत्यंत पौष्टिक आणि चवदार लागते.
हिवाळ्यात लसूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अनेक पोषक तत्वांचा खजिना असलेला लसूण आपली प्रतिकारशक्ती देखील मजबूत करतो. लसणामध्ये प्रथिने, चरबी, कर्बोदके, खनिजे, लोह असते. याशिवाय जीवनसत्त्वे ए, बी, सी आणि सल्फ्यूरिक अॅसिड विशेष प्रमाणात आढळतात. आज आपण लसणाचे लोणचे बनवण्याची रेसिपी जाणून घेणार आहोत. हे लोणचे आपण पोळी, खिचडी, भात, पराठ्यासोबत खाऊ शकतो.
चला, जाणून घ्या लसणाचे लोणचे कसे बनवायचे त्याची रेसिपी
साहित्य
साल काढलेला लसूण एक वाटी, एक वाटी मोहरीचे तेल, एक चमचा मेथी दाणे, एक चमचे बडीशोप, एक चमचा मोहरी, एक चमचा हिंग, चवीनुसार लाल तिखट, हळद एक चमचा, व्हिनेगर अर्धा कप (किंवा लिंबू) चवीनुसार मीठ
बनवण्याची पद्धत
– सर्वप्रथम पॅन किंवा कढईत मोहरीचे तेल घेऊन चांगले गरम करून घ्या.
– तेल गरम झाल्यावर गॅस बंद करून ते सामान्य तापमानाला येऊ द्या.
– आता पुन्हा गॅस चालू करून खूप मंद करा, आता त्या तेलात लसूण घाला आणि थोडे मऊ होईपर्यंत शिजवा, लक्षात ठेवा की ते जाळू नका.
– लसूण मऊ झाला आहे, असे वाटल्यावर त्यात हिंग, बडीशेप, मेथी, मोहरी, बडीशेप टाकून थोडावेळ हलके परतून घ्या.
– आता त्यात हळद, तिखट आणि मीठ घालून मिक्स करा.
– गॅस बंद करा आणि थोडा थंड होऊ द्या, काही सेकंदांनंतर त्यात व्हिनेगर घाला आणि मिक्स करा.
– आता हे लोणचे आपल्याला खाण्यासाठी तयार झाले चला तर मग चाखून बघु या.