मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लहान मुलाचा ताबा कुणाकडे, त्याच्या आईकडे की वडिलांकडे, यावरून निर्माण झालेला वाद कनिष्ठ न्यायालयापुढे सुनावणीसाठी नुकताच आला होता. या प्रकरणात न्यायालयाने निकाल दिला असून मुलांच्या जडणघडणीत आईइतके योगदान कोणीही देऊ शकत नाही, त्याची आजीही नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
मुंबईतील कनिष्ठ न्यायालयाकडे मुलाच्या ताब्यासंबंधित एक प्रकरण आले होते. या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने मुलाच्या ताब्याविषयी अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला. लहान मुलांच्या जडणघडणीत आईचे अनन्यसाधारण योगदान असल्याचे निकालात स्पष्ट करण्यात आले. “कोणत्याही लहान मुलाच्या जडणघडणीत जेवढ्या प्रमाणात त्या मुलाच्या जन्मदात्रीचे अर्थात मुलाच्या आईचे योगदान असते, तितके योगदान दुसरे कोणीही देऊ शकत नाही. त्या मुलाची आजी हीदेखील त्या मुलाच्या आईसाठी पर्याय बनू शकत नाही. आजी मुलाच्या आईची जागा घेऊ शकत नाही”, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबईतील कनिष्ठ न्यायालयाने दिला आहे.
एका प्रकरणात लहान मुलाच्या कस्टडीवरून वाद निर्माण झाला आहे. या कायदेशीर वादाचा फैसला करताना कनिष्ठ न्यायालयाने मुलाची कस्टडी त्याच्या आईकडे देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मुलाचा ताबा त्याच्या आईकडे देण्याचा आदेश देतानाच मुलाच्या पालनपोषणासाठी प्रत्येक महिन्याला २० हजार रुपयांचा निर्वाह भत्ता द्या, असा आदेशही न्यायालयाने मुलाच्या पित्याला दिला आहे. न्यायालयाने मुलाला आईकडून मिळणार्या माया-ममतेची दुसर्या कुणाशीही तुलना केली जाऊ शकत नसल्याचे महत्त्वपूर्ण मतदेखील नोंदवले आहे.
असे आहे प्रकरण
पुण्यातील एका ३७ वर्षीय व्यक्तीने २०१२ मध्ये मुंबईतील एका महिलेशी लग्न केले होते. त्या महिलेने गेल्या वर्षी पती आणि सासरच्या लोकांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दंडाधिकारी न्यायालयात दाखल केली होती. मुलाला भेटण्यापासून रोखले जात असल्याचा आरोपही तिने केला होता. या प्रकरणात गेल्या आठवड्यात न्यायालयात सुनावणी झाली.
न्यायालयाने संबंधित महिलेला पतीने दरमहा २० हजार रुपये भत्ता देण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच मुलाचा ताबाही महिलेला देण्यात आला. मुलाच्या विकासासाठी त्याची आई सोबत असणे अधिक महत्त्वाचे आहे. या प्रकरणात पतीने पत्नीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा दावा केला होता. मात्र, तिला कोणताही मानसिक आजार नसल्याचे तपासात सिद्ध झाले आणि न्यायालयाने पतीचा दावा फेटाळून लावला.
Who Will Care Child Mother Father or Else Mumbai High Court Says
Legal Child Custody