इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– आपलं पर्यावरण –
कार्बन फूटप्रिंट
अलीकडे क्लायमेट चेंज हा शब्द वारंवार वापरला जातोय्. कार्बन उत्सर्जन या शब्दाचाही उल्लेख सातत्याने होतो आहे. याचा अर्थ, क्लायमेट चेंज हा कार्बन उत्सर्जनाच्या प्रक्रियेचा एक स्वाभाविक परिणाम आहे का? वातावरणातील तापमान आणि हवामानाच्या परंपरागत रचनेतील बदल ज्याचा मानव, प्राणी, पशु, पक्षी, झाडं आणि एकूणच सॄष्टीतील सजीव-निर्जीव घटकांवर परिणाम होतो, त्या क्लायमेट चेंज बाबत आता सारे जग चिंता व्यक्त करू लागले आहे. कार्बनचा एक आणि ऑक्सिजनचे दोन घटक मिळून तयार होणारा कार्बन डायऑक्साइड वायू माणसाला श्वासोच्छ्वासाच्या प्रक्रियेमुळे ठावूक आहे.
विविध उद्योगांमधून उत्सर्जित होणारे दूषित ग्रीन हाऊस गॅसेस मध्ये कार्बन डायऑक्साइड हा औ एक महत्त्वाचा आणि मोठा घटक असतो. कार्बन डायऑक्साइडचे एका विशिष्ट प्रमाणातील अस्तित्व पॄथ्वीवरील वातावरण आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आवश्यक आहे. पण त्याचे हे प्रमाण बिघडले की त्याचे दुष्परिणामही समोर येतात. गेल्या सुमारे पन्नास वर्षांत ज्या वेगाने शहरीकरण, औद्योगिकीकरण वाढले आहे, त्याचे थेट परिणाम ग्रीन हाऊस गॅसेस मध्ये वाढ होण्यात होताहेत. रस्त्यांवरची वाहने, आकाशात उडणारी विमाने, शेतात वापरले जाणारे रासायनिक घटक, सतत जाळले जाणारे तेल, कोळसा व इतर इंधने, ज्वालामुखी सारख्या नैसर्गिक घटना आदी बाबी वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढण्यास कारणीभूत ठरत आहेत. या तर सार्वजनिक आणि सामुहिक स्तरावरील बाबी आहेत. वैयक्तिक पातळीवर सुद्धा प्रत्येक मानव त्याच्या वैयक्तिगत कॄतीतून यात भरच घालत असतो.
स्वयंपाकासाठी वापरल्या जाणारी चूल पेटविण्यासाठी जाळल्या जाणाऱ्या लाकडापासून तर आधुनिक काळातील कीचनमध्ये जाळल्या जाणाऱ्या गॅसपर्यंत, माणसं घालण्यासाठी वापरतात ते कपडे तयार करण्याच्या प्रक्रियेपासून तर पिझ्झा तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ओव्हन पर्यंत, अगदी लग्नसमारंभात सर्रास वापरल्या प्लास्टिक पासून तर अलीकडे ज्याचे फॅड अवतरले आहे त्या ‘युज ॲण्ड थ्रो’ तत्वातील वस्तूंपर्यंत….
कळत न कळत आम्ही वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे संतुलन बिघडवत असतो. कारखान्यांच्या चिमण्या, वाहनांमधून बाहेर पडणारा धूर निदान दिसतो तरी. पण घरात जाळल्या जाणाऱ्या गॅसचेही वातावरणावर विपरीत परिणाम होत असतील हे तर ध्यानातही येत नाही कुणाच्या. नित्याची, सहज कॄती असते ना ती! असं म्हणतात की अमेरिकेत वैयक्तिक, सामूहिक आणि उद्योग आदी माध्यमातून वर्षाकाठी १६ टन कार्बन डायऑक्साइडची भर पडते. चीन मध्ये हे प्रमाण ७ टन एवढे आहे. युक्रेन मध्ये ते ५.५ टन एवढे आहे, तर कोंगो मध्ये ०.०३ टन, कॅटल नामक एका अतिशय छोट्याशा देशात तर ते ३८ टन एवढे आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ते निर्माण होत असेल तर तेवढ्याच मोठ्या प्रमाणात त्याचे परिणामही स्वाभाविक आहेत.
माणसाला, अन्य जीव जंतूंना जगण्यासाठी आवश्यक असलेली पॄथ्वीतलावरील जमीन आणि पाणी, त्यांच्यासाठी आवश्यक अशी संसाधने निर्माण करण्यासाठी आणि वेस्टचे समायोजन करण्यासाठी लागणारा भूभाग याचा विचार करता, मानवी कॄतीतून निर्माण होणाऱ्या ग्रीन हाऊस गॅसेसध्ये मिथेन, नायट्रोजन व अन्य वायूंचाही समावेश असला तरी, यात कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण अत्याधिक आहे. इतके की, एका बाजूला कार्बन डायऑक्साइड आणि दुसऱ्या बाजूला इतर सारे गॅसेस ठेवले तरी तराजूचे माप कार्बन डायऑक्साइडच्या बाजूने झुकेल. इतक्या मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या कार्बन आणि अन्य घटकांच्या विघटनासाठीचे प्रयत्न मात्र त्या तुलनेत फारच कमी आहेत. पण वातावरणातील कार्बनचे उत्सर्जन आणि शोषणाच्या माध्यमातून त्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी पावलं उचलणे आवश्यक आहे.
आज अमेरिका आणि चीन सारख्या देशातील किमान साठ टक्के वीज निर्मिती कोळसा आदी खनिज संपत्तीच्या ज्वलनातून होते. किती कार्बन उत्सर्जन होत असेल कल्पना करा! इतकेच कशाला, इंधन वाचविण्यासाठी म्हणून ज्या इलेक्ट्रिक गाड्या अलीकडे आपण वापरायला लागलो आहोत, त्यातूनही कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन होतेच. त्यामुळे पवन, जल, सौर ऊर्जेच्या निर्मितीवर भर देणे ही येत्या काळाची गरज असणार आहे. वॄक्षारोपण करता येईल तितके करणे, शक्य तितक्या जलाशयांची निर्मिती करणे, हा त्यावरचा खरा उपाय आहे. पण आज अमेरिका व अन्य श्रीमंत देश, स्वतः मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन करून पैशाच्या जोरावर त्याचे दुष्परिणाम रोखण्याची जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलून मोकळे होताहेत.
कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी पावलं उचलण्याऐवजी त्याचा दंड म्हणून पैसे मोजणे त्यांना सोपे वाटते आहे. पण हा केवळ स्वतःची जबाबदारी झटकण्याचा प्रकार झाला. दुसऱ्या देशात आहेत तीच जंगलं पैसै मोजून तांत्रिक दृष्ट्या विकत घ्यायची आणि आम्ही कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी खूप काही केल्याचा गवगवा करायचा अशी तर्हा झाली. याने कागदोपत्री कार्यवाही तेवढी दिसेल. अपेक्षित परिणाम मात्र साधले जाणार नाहीत.
वैयक्तिक पातळीवर देखील माणसाला काही उपाय करावे लागतील. त्यासाठी खानपान आणि वर्तनाच्या सवयी बदलाव्या लागतील. पायी चालणे, सायकल वापरणे, विमानाचा वापर कमी करणे, कमी खाणे, विशेषतः मटण व बीफ कमी खाणे, प्रदूषण कमी करण्यासाठी काम करणाऱ्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होणे….या बाबी जनतेने केल्यात तर कार्बन फूटप्रिंटचे प्रमाण कमी व्हायला मदत होईल…शेवटी माणसाचे अस्तित्व पैशाच्या नव्हे, ऑक्सिजनच्या भरवशावर आहे…खरं ना?
डॉ. प्रवीण महाजन
जल अभ्यासक,
डॉ. शंकररावजी चव्हाण राज्यस्तरीय जलभूषण पुरस्कार्थी (महाराष्ट्र शासन).
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “चला जाणूया नदीला` राज्यस्तरीय समिती सदस्य, (महाराष्ट्र शासन).
१८१, बाजार रोड, लक्ष्मीभुवन चौक ते रामनगर चौक रोड, धरमपेठ एक्स. नागपूर – ४४००१०
मो.- 9822380111 ईमेल :- pravin5858@gmail.com
What is Carbon Footprint in detail by Dr Pravin Mahajan