मुंबई – विधान परिषद निवडणुकीच्या दोन जागांचा निकाल लागला असून यात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. या दोन्ही जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलडाणा या दोन जागांसाठी आज मतमोजणी झाली. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील ही निवडणूक आहे. एका जागेवर शिवसेनेचा तर दुसऱ्या जागेवर काँग्रेसचा पराभव झाला आहे.
अकोल्यात खंडेलवाल विजयी
अकोला-वाशिम-बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया हे पराभूत झाले आहेत. याठिताणी भाजपचे वसंत खंडेलवाल हे विजयी झाले आहेत. बजोरिया यांना ३२८ तर खंडेलवाल यांना ४३८ मते मिळाली आहेत. या विजयानंतर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. महाविकास आघाडी आणि भाजप यांच्याकडे स्पष्ट बहुमत नव्हते. मात्र, भाजपने आपले कसब पणाला लावले. तसेच, या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार झाल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
नागपूरमध्ये बावनकुळेंना संधी
नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे विजयी झाले आहेत. ही निवडणूक अतिशय रंगतदार झाली. भाजपचे नगरसेवक डॉ. रविंद्र (छोटू) भोयर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने त्यांना उमेदवारी जाहीर केली. ऐनवेळी डॉ. भोयर यांनी निवडणूक लढविण्यात असमर्थता दर्शविली. त्यामुळे काँग्रेसने मतदानाच्या आदल्या दिवशी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला. या सर्व गोंधळात भाजपला फायदा झाला. त्यामुळेच बावनकुळे यांचा विजय झाल्याचे बोलले जात आहे. तसेच, भाजपने त्यांचे सर्व नगरसेवक सहलीला नेले होते. ही सर्व मते भाजपलाच मिळाली.
नागपूरमध्ये उमेदवारांना मिळालेली मते अशी- चंद्रशेखर बावनकुळे ३६२, डॉ. रवींद्र भोयर ०१, मंगेश सुधाकर देशमुख १८६ एकूण वैध मते ५४९ अवैध मते ०५ . एकूण मतदान ५५४. निवडणुकीसाठी ठरलेला कोटा- २७५. पहिल्याच फेरीत कोटा पूर्ण केल्यामुळे भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विमला आर. यांनी विजयी घोषित केले.