इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
तुम्ही योगसाधना करीत असाल तर…
तुम्ही योगसाधना करीत असाल, तर तुम्ही दुर्बलता, नीचता, इच्छाशक्तीचा अभाव, ज्ञानापाठोपाठ सामर्थ्य न येणे ह्या बाबींचा स्वीकार करता कामा नये. एखादी गोष्ट आपल्यात असता कामा नये याची जाणीव होणे आणि तरीही ती तशीच चालू ठेवणे हे दुर्बलतेचे लक्षण असते. ही दुर्बलता कोणत्याही गंभीर अशा योगसाधनेत स्वीकारली जात नाही; अशा संकल्पशक्तीचा अभाव हा व्यक्तीला अप्रामाणिकतेच्या उंबरठ्यावर आणून सोडतो.
अमुक एक गोष्ट असता कामा नये, हे तुम्हाला ज्या क्षणी कळते, तेव्हा ती गोष्ट आपल्यात राहता कामा नये, हे ठरविणारे तुम्हीच असता. कारण ज्ञान आणि सामर्थ्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे असे म्हणता येईल की, तुमच्या अस्तित्वाच्या कोणत्याही भागात तुम्ही तुमच्या प्रगतीच्या मध्यवर्ती संकल्पशक्तीला विरोधी असणाऱ्या, वाईट इच्छेच्या छायेला थारा देता कामा नये. कारण तसे केल्याने ज्या अनिष्टाचा तुम्ही नायनाट केला पाहिजे त्याच अनिष्टासमोर तुमच्या प्रगतीची संकल्पशक्ती पौरुषहीन, दुबळी, धैर्यहीन, सामर्थ्यहीन ठरते.