विचार पुष्प
ही सवय मोडली पाहिजे
वर्तमानांतील दरक्षणी जागृत राहून आपल्याला जर काम करावयाचे आहे, तर मग औत्सुक्याने आकर्षित होऊन भविष्यकाळात डोकावण्याची आपल्या मनाची सवय आपण मोडली पाहिजे. भविष्यकाळापर्यंत आपले हात – या वर्तमानांत काम करीत असतांना – कसे काय पोहोचू शकतील? समजा पोहोचले; तरी भविष्यकाळी आपल्यासाठी कोणते काम येणार आहे याचे ज्ञान आपल्याला आहे काय? वास्तविक भविष्यात डोकावण्याचे कारणच नाही. कारण ज्यावेळी एखादे काम आपल्याजवळ येते, त्यावेळी त्याविषयीचे ज्ञान आणि ते पूर्ण करण्यासाठी लागणारे सामर्थ्य हे देखील त्याबरोबरच येत असते. किंवा तशी आपली पात्रता असते म्हणूनच ते काम आपल्यासमोर आपल्याकरिता येऊन उभे राहिलेले असते. म्हणूनच आताच्याच, या वर्तमानक्षणीच जे काही काम आपल्या हाती आहे त्यावरच आपले सर्व लक्ष आणि शक्ति आपण केंद्रित करू या.