इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना शह देण्यात भारतीय जनता पक्ष वरचढ ठरला आहे. भाजपने यादव यांच्या कुटुंबातच फूट पाडली आहे. अखिलेश यांच्या वहिनी अपर्णा यादव यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अपर्णा यांना भाजपतर्फे उमेदवारी देण्यात येणार आहे.
छोट्या मोठ्या नेत्यांच्या पक्षांतरामुळे उत्तर प्रदेशची निवडणूक रंगतदार होत आहे. समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे मित्र हरी ओम यादव यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. त्यानंतर आता खुद्द मुलायम सिंह यांची धाकटी सून आणि प्रतीक यादव यांच्या पत्नी अपर्णा यादव यांनी आज सकाळी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत होत्या.
अपर्णा या लखनऊ कँट विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार असू शकतात. अपर्णा यांनी २०१७ मध्ये विधानसभेची निवडणूक लखनऊ कँटमधून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर लढवली होती. परंतु त्यांना भाजप उमेदवार रिटा बहुगुणा जोशी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
भाजपा की जन कल्याणकारी नीतियों से प्रभावित होकर श्रीमती अपर्णा यादव ने पार्टी की सदस्यता ग्रहण की#सबका_साथ_सबका_विकास pic.twitter.com/4jh9wO9aqv
— BJP Uttar Pradesh (@BJP4UP) January 19, 2022
हे सुद्धा झाले भाजपवासी
फिरोजाबादच्या सिरसागंज मतदारसंघातील सपा आमदार हरी ओम यादव यांनी यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हरी यादव हे मुलायम सिंह यांचे नातेवाईक आणि मित्र आहेत. माजी आयपीएस अधिकारी असीम अरुण हे सुद्धा भाजपवासी झाले आहेत. कानपूरचे पोलीस आयुक्त असीम अरुण यांनी नुकतीच स्वेच्छानिवृत्ती घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. असीम यांना कन्नौजच्या जागेवर भाजपकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सत्ताधारी भाजपचे तीन मंत्री स्वामी प्रसाद मौर्य, दारा सिंह चौहान आणि धरमसिंग सैनी यांनी निवडणूक जाहीर होताच भाजपचा सोडचिठ्ठी दिली. या तिघांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे.