इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशातील पाच राज्यांमध्ये सध्या निवडणूक होत आहे. त्यातील उत्तर प्रदेशकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवित असल्याने त्यांच्याबद्दल मोठी उत्सुकता आहे. योगी यांच्याकडे संपत्ती किती, त्यांच्याकडे काय काय आहे, असे प्रश्न अनेकांना पडले आहे. त्याचा खुलासा अखेर झाला आहे. योगी यांनी उमेदवारी अर्जासोबत शपथपत्र दिले आहे. त्यात सर्व संपत्तीचा उल्लेख केला आहे.
योगींच्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांनी एचएन बहुगुणा विद्यापीठ श्रीनगर, पौडी गढवाल येथून बीएससी पदवी संपादन केली आहे. विधानपरिषदेवर निवडून आले तेव्हा योगी यांची एकूण संपत्ती 95 कोटी 98 लाख रुपये एवढी होती. आता ही संपत्ती 1 कोटी 54 लाख 94 हजार 54 रुपये झाली आहे. म्हणजेच योगींच्या संपत्तीत गेल्या 5 वर्षात सुमारे 60 लाख रुपयांची वाढ झाली आहे. परंतु योगी यांच्याकडे स्वतःचे ना घर आहे, ना जमीन. दोन कार असल्याचे योगींनी गेल्या शपथपत्रात नमूद केले होते. मात्र आता त्यांनी सांगितले आहे की, त्यांच्याकडे एकही कार नाही. आपल्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर योगींनी 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली नाही. मात्र, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून योगी आदित्यनाथ यांची संपत्ती 72 लाख 17 हजार रुपये होती. योगी यांच्याकडे सध्या एक लाख रुपये रोख आहेत.
योगी यांच्याकडे नवी दिल्लीतील एसबीआय संसद भवन शाखेत 25 लाख 99 हजार 171 रुपये आहेत. याशिवाय 4 लाख 32 हजार 751 रुपयांच्या चार ठेवी (एफडी), पीएनबीच्या इंडस्ट्रियल एरिया गोरखनाथ शाखेत 7 लाख 12 हजार 636 रुपये आणि एसबीआयच्या गोरखनाथ शाखेच्या खात्यात 7 हजार 908 रुपये जमा आहेत. त्याचप्रमाणे लखनऊ येथील एसबीआयच्या विधानसभा मार्ग शाखेच्या खात्यात 67 लाख 85 हजार 395 रुपये आहेत, तर त्यांच्या नावावर 2 लाख 33 हजार रुपयांचा विमा आहे.
गोरखपूर शहरातून पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत असलेल्या आदित्यनाथ यांच्याकडे 49 हजार रुपये किंमतीचे 20 ग्रॅम सोन्याचे कडे, 20 हजार रुपये किंमतीचे 10 ग्रॅम रुद्राक्ष असलेली सोन्याची चैन आहे. याशिवाय त्यांच्याकडे 12 हजार रुपये किंमतीचा सॅमसंग मोबाईल आहे. विशेष म्हणजे योगींनाही रायफल आणि रिव्हॉल्व्हर ठेवण्याचा शौक आहे. योगींकडे दोन शस्त्रे आहेत. त्यामध्ये 1 लाख किंमतीचे रिव्हॉल्व्हर आणि 80 हजार रुपये किंमतीची रायफल आहे.