अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
विद्यार्थ्यांना पदवीसोबतच कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध होईल, अशा पद्धतीने यूजीसी आता उच्च शिक्षणाशी संबंधित सर्व अभ्यासक्रम तयार करत आहे. ज्या विषयाचा अभ्यास सध्या तरुणांकडून केला जात आहे, त्याच विषयांशी संबंधित हे प्रशिक्षण असणार आहे. त्यामुळे या प्रशिक्षणाचा प्रत्यक्ष अवलंब करणेदेखील सोपे होणार आहे. यातून प्रत्येक सुशिक्षित आणि तरुणांना रोजगार देण्याचा मार्ग थोडा सोपा होऊ शकतो, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) आता उच्च शिक्षणाशी संबंधित सर्व अभ्यासक्रमांची रचना नव्या पद्धतीने करत आहे. पदवीसोबतच कौशल्य प्रशिक्षणही यामुळे उपलब्ध होईल. जो विद्यार्थी ज्या कोर्स किंवा फील्डमध्ये शिकत आहे त्याच कोर्सशी संबंधित हे प्रशिक्षण असल्याने अधिक फायदा होणार आहे. यामध्ये पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र अशा सर्व स्तरावरील अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात येणार आहे.
नवीन शैक्षणिक सत्रापासून म्हणजेच २०२२-२३ पासून या मानकांनुसार पदवीपासून पदव्युत्तर स्तरापर्यंतचे सर्व अभ्यासक्रम सुरू केले जातील, असे मानले जात आहे. दरम्यान, विद्यापीठ अनुदान आयोगाने राष्ट्रीय उच्च शिक्षण पात्रता फ्रेमवर्कमधील बदलांशी संबंधित एक मसुदा तयार केला आहे. तसेच प्रत्येक अभ्यासक्रमासाठी नवीन मानकेही यूजीसीने निश्चित केली आहेत. सद्यस्थितीत यूजीसीने या मसुद्यावर सर्व विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांकडून १३ फेब्रुवारीपर्यंत सूचना मागवल्या आहेत. २१व्या शतकाची गरज लक्षात घेऊन अभ्यासक्रमांमध्ये बदल करून त्यांना रोजगारक्षम बनवण्याची शिफारस नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात करण्यात आली होती, जी आता लागू होत आहे. याशिवाय, यूजीसीने प्रस्तावित केलेल्या उच्च शिक्षणाच्या या नवीन मसुद्यात उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमांना कौशल्य आणि व्यावसायिक शिक्षणाची जोड देण्यात आली आहे. सध्या, या प्रकारचे प्रशिक्षण किंवा इंटर्नशिप सामान्य पदवी अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट नाही.
अभ्यासक्रमात प्रशिक्षणाचा समावेश करण्यात आल्याने या अभ्यासक्रमातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करून संबंधित क्षेत्रात जाण्याचा पर्याय उपलब्ध होईल. तसेच मसुद्यात समाविष्ट करण्यात आलेल्या महत्वाच्या बदलांमध्ये सर्व अभ्यासक्रमांना एका क्रेडिटशी जोडले जाईल. नव्या व्यवस्थेमध्ये क्रेडिट स्कोअर अॅकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट (ABC) मध्ये जमा केला जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना संशोधनाची आवड आहे, त्यांच्यासाठी बॅचलर डिग्री (संशोधन) नावाचा चार वर्षांचा स्वतंत्र अभ्यासक्रम असेल. यानंतर त्यांना थेट पीएचडीसाठी प्रवेश घेता येणार आहे.