नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यामध्ये बालकांसाठी नियमित लसीकरण सुरू आहे. त्यामध्ये आता पोलिओचा अतिरिक्त डोस F-IPV (इन 7 ऍक्टिव्हेटेड पोलिओ वायरस) हे देण्यात येत आहे. नियमित लसीकरण अंतर्गत बालकास जन्मानंतर सहा आठवडे पूर्ण झाल्यावर पहिला डोस तसेच चौदा आठवडे पूर्ण झाल्यावर दुसरा डोस असे एकूण दोन डोस देण्यात येत आहेत. तथापि शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार १ जानेवारी २०२३ पासून F-IPV हा तिसरा डोस दिला जात आहे. ज्या बालकाचे नऊ महिने पूर्ण झाले आहे त्यांना देण्यात येणार आहे. सदर लसीकरणाचा उद्देश हा पोलिओ उद्रेकाची व्याप्ती मर्यादित ठेवणे तसेच समाजामध्ये सामूहिक प्रतिकार शक्ती वाढविणे असा आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शनानुसार जानेवारी २०२३ पासून हा तिसरा डोस नियमित लसीकरणात समाविष्ट करण्यात येत आहे. हा f- IPV लस्सीचा तिसरा डोस बालकास नऊ महिने पूर्ण झाल्यावर देण्यात येणार आहे. सदर डोस नऊ ते बारा महिने या वयोगटातील गोवर रूबेला लसीच्या पहिल्या डोस बरोबर देण्यात येणार आहे. याबाबत आरोग्य विभागातील सर्व स्तरावर प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.
तरी सर्व पालकांनी डोस मधील बदल लक्षात घेऊन आपल्या मुलांचे वयोगटा प्रमाणे बालकांना त्यांच्या वयाच्या सहा आठवडे पूर्ण झाल्यावर १४ आठवडे पूर्ण झाल्यावर आणि नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर पहिला दुसरा व तिसरा असे तीन डोस जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अशीमा मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हर्षल नेहते, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ कैलास भोये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ युवराज देवरे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन खरात यांनी केले आहे.
Union Government Children’s Vaccination New Guidelines
Health Polio