त्र्यंबकेश्वर – भोंग्याच्या विषयावर राजकीय पोळी भाजून घेण्याचा सध्या प्रकार सुरु असून यातील भोंग्याचा एम्प्लीफायर वेगळा आहे. तो कोण आहे व आवाज कोणाचा आहे हे सर्वांच्या लक्षात आले असल्याचे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, सुप्रीम कोर्टाचा निर्णय कोविड सुरु व्हायला व निर्णय यायला एकच गाठ झाली. त्यात सुप्रीम कोर्टाची अंमलबजावणी काही ठिकाणी लागूही झाली. तर काही ठिकाणी अंमलबजावणी राहून गेली. १९९५ मध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की मस्जिद असो मंदिर असो वा चर्च असो किंवा कुठल्याही प्रार्थना स्थळावर असलेल्या भोंग्याने इतरांना त्रास होत असेल तर त्याचा आवाज कमी करा. पण सध्याचा हा भोंगा निश्चितच वेगळा आहे. यामागे बोलविता धनी वेगळाच असल्याचेही त्यांनी सांगितले.
पेडणेकर या त्र्यंबकेश्वर येथे रात्रभर अखिल भारतीय गुरुपीठ प्रकल्पात आपल्या कुटुंबियां समवेत होत्या. आज त्या दर्शनासाठी आल्या होत्या. त्यांनी पावणेचारच्या दरम्यान भगवान श्रीत्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. त्या श्रीस्वामी समर्थ गुरुकुल प्रकल्पाच्या सदगुरु चॅरिटेबल ट्रस्ट मोरेदादा हॅास्पिटलच्या भूमीपूजन समारंभासाठी आल्या होत्या. आज फक्त त्यांनी त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. मंदिराचे विश्वस्त संतोष कदम व भूषण अडसरे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांचा भगवान त्र्यंबक राजाची प्रतिमा, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्र्यंबकेश्वर मंदिर पाहून त्या खुश झाल्या. दरम्यान गूरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या कार्याचा त्यांनी आवर्जून आदराने उल्लेख केला.