मुंबई – भारतीय दूरचित्रवाणीच्या इतिहासात तारक मेहता का उल्टा चष्मा ही सर्वात यशस्वी मालिका ठरली आहे. गेल्या १३ वर्षांपासून सुरू असलेल्या या मालिकेतील अनेक कलाकार असे आहेत ज्यांनी काही ना काही कारणांमुळे ही मालिका मध्येच सोडून दिली आहे. या यादीत आता आणखी एक नाव जोडले गेले आहे. ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. इतकी प्रसिद्ध व्यक्तीरेखा कशी मालिका सोडू शकते, हा प्रश्न तुम्हाला पडेल.
कोईमोई या मनोरंजन बातम्या देणाऱ्या संकेतस्थळाच्या माहितीनुसार, टप्पूची व्यक्तीरेखा साकारणारा राज अनाकदत याने ही मालिका सोडण्याचे निश्चित केले आहे. २०१७ मध्ये भव्या गांधीने टप्पूची व्यक्तीरेखा पुढे साकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर मालिकेत राजचा प्रवेश झाला. त्याच्या फॅन्सना ही बातमी वाचून नक्कीच वाईट वाटणार आहे.
मालिकेशी संबंधित एका सूत्राने संकेतस्थळाला माहिती दिली की, राजसोबतचा हा प्रवास खूपच चांगला झाला आहे. अनेकदा टीमने त्याच्यासोबत ताळमेळ बसविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु आता सर्व गोष्टी जुळून येत नाहीयेत. तो दीर्घकाळ मालिकेत थांबण्यास उत्सुक नाहीये आणि मालिका कलाकार आणि इतर सदस्य त्याला थांबण्यासाठी विनंती करत नाहीयेत.
राज अनाकदत याने यापूर्वीच मालिका सोडली का हे अद्याप निश्चित कळू शकले नाही. कारण यावर त्याने अद्याप भाष्य केले नाही. मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांना याविषयी विचारले असता, ते म्हणाले, माहिती नाही…मला याविषयी काहीच ठाऊक नाही.
राज याने मालिकेत काम सुरू केले तेव्हा त्याच्याबद्दल अनेक वाद निर्माण होत आले आहेत. मालिकेत त्याच्या वडिलांची व्यक्तिरेखा साकारणारे जेठालाल म्हणजेच दिलीप आणि राज यांच्या पटत नव्हते. हा वाद थांबला नाही तो राज आणि बबिताची व्यक्तिरेखा साकारणार्या मुनमुन दत्ता हिच्यासोबत त्याच्या अफेअरच्या बातम्यांनी मथळे सजले होते.