इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सोन्याला मोठे मोल आहे. त्यामुळेच त्याची जगभरातच मोठी तस्करी होते. भारतातील एक शहर सध्या सोने तस्करीचे मोठे केंद्र बनले आहे. ते म्हणजे कोलकाता. म्यानमार, थायलंड आणि लाओसच्या सीमावर्ती भागातून तस्करी केलेले सोने कोलकात्यात आणून देशाच्या विविध भागात तस्करी केली जात आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) हा खळबळजनक खुलासा केला आहे.
तब्बल ५०० किलो सोने
डीआरआयच्या म्हणण्यानुसार, म्यानमार, थायलंड आणि लाओसच्या ‘गोल्डन ट्रँगल’ सीमा भागातून सोन्याची तस्करी केली जात आहे. यासाठी कोलकाताचा वापर संक्रमण शिबिर म्हणून केला जात आहे. कोलकाता येथे आतापर्यंत सुमारे ५०० किलो सोने आणून लपवले गेले आहे, ज्याचे बाजारमूल्य सुमारे २५० कोटी रुपये आहे. येथे या टोळीचा म्होरक्या कैलास माहेश्वरी नावाचा व्यक्ती आहे. डीआरआय त्याचा शोध घेत आहे. डीआरआयचा अंदाज आहे की कोलकात्यातील काही व्यावसायिक भागात तस्करीच्या सोन्याचे ‘स्टॉक यार्ड’ तयार करण्यात आले आहे. तेथे सोने बुटके, नाणी आणि बिस्किटांच्या रूपात आहे. येथून दररोज २० ते ३० किलो सोन्याची तस्करी देशाच्या विविध भागात होत आहे.
टोळीत महिलाही
कैलास माहेश्वरीची स्वतःची ३०-३५ जणांची टोळी असून त्यात महिलांचाही समावेश आहे. दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसमधून या टोळीतील दोघांना सीबीआयने अटक केली होती. त्याच्या चौकशीत या सर्व बाबी समोर आल्या आहेत. या सर्वांना एक कोटी रुपयांपेक्षा कमी किमतीच्या सोन्याच्या तस्करीचे काम सोपवण्यात आले होते, कारण अशा प्रकरणात पकडले गेल्यास जामीन सहज मिळतो, असेही त्याने चौकशीदरम्यान सांगितले. महत्त्वाचे म्हणजे, डीआरआयने २०२१-२२ या आर्थिक वर्षात ८३३ किलो सोने जप्त केले होते, त्यापैकी बहुतांश म्यानमार आणि बांगलादेशातून पुरवठा करण्यात आला होता.
This Indian City is Major Centre of Gold Smuggling
DRI