अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
उमराणे येथील कांदा व्यापारी यांच्या खळ्यात काम करणाऱ्या मजुराकडे काल रात्री चोरट्यांनी सुमारे ३० ते ३५ हजार रुपयांची मुद्देमालाची चोरी केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. येथील कांदा व्यापारी बाळासाहेब रंभाजी देवरे यांचे मुबंई आग्रा रोड वर बायपास रस्त्यावर संजना आडत म्हणून कांद्याचे खळे आहे. या खळ्यात जायखेडा येथील राजेंद्र मोहिते हे दोन वर्षापासून परिवारासहित राहत असून तेथेच मजुरी करतात. काल रात्री परिवारासहित झोपलेले असताना एक वाजेच्या सुमारास दोन चोरटे आले. मागील बाजूस बांधलेल्या शेडमध्ये घुसले तेथून त्यांनी सहा बॅगा उचलल्या, यात दोन मुलींच्या बॅगेत साडे पंधरा हजार रुपये रोख होते. जावयाचा मोबाईल सहित तीन मोबाईल, आधार पॅन शाळेचे दाखले, आधी सर्व कागदपत्रे कपडे सहित अंदाजे ३० ते ३५ हजार रुपयाची चोरट्यांनी लंपास केले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रात्री बाळासाहेब देवरे यांचा मुलगा अर्णव देवरे याने १०० नंबर डायल करून ही घटना कळवली. त्यानंतर तात्काळ देवळा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल श्रावण शिंदे व शेख घटनास्थळी हजर होत तपास सुरू केला आहे.